Malegaon Outer | मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाची जनतेची विकासाला साथPudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 9:49 am
Updated on
:
24 Nov 2024, 9:49 am
परिवर्तन अटळच्या घोषणेला धुडकावून लावत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील जनतेने विकासाला साथ दिली. महायुती शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री दादा भुसे हे पाचव्यांदा विक्रमी मतधिक्याने विजयी झाले. भुसे यांना एक लाख 58 हजार 284 मते मिळाली असून, त्यांनी अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्छाव यांचा सुमारे एक लाख सहा हजार 606 मतांनी पराभव केला.
मतदारांनी परिवर्तनाच्या घोषणेला धुडकावत दिले विक्रमी मताधिक्य
लाडक्या बहिणींचे भुसेंना भरभरून आशीर्वाद
दादा भुसेंनी केले 15 प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
मिळालेली मते
दादा भुसे - 1,58,284
बंडूकाका बच्छाव - 51,678
अद्वय हिरे - 39,834
बंडूकाका बच्छाव यांना 51 हजार 678 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे यांना 39 हजार 834 मत घेत तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भुसे यांच्या मतधिक्यात वाढ झाली आहे. त्यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. बाह्य मतदारसंघात एकूण 17 उमेदवार होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडून 67.74 टक्के मतदान झाले होते. 2019 च्या टक्केवारीपेक्षा यावेळी आठ ते साडेआठ टक्के मतदान वाढले होते. शनिवारी (दि. 23) शासकीय वखार महामंडळाच्या गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ, सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. यावेळी निवडणूक निरीक्षक राहुलकुमार हे उपस्थित होते. प्रारंभी टपाली मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर 14 टेबलांवर मतदान यंत्रांची मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासूनच भुसे यांची आघाडी वाढत होती. ती 26 व्या फेरीअखेर कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब झाले व भुसे यांनी मतदान केंद्रात विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले.
भुसे यांचे आगमन 3 च्या सुमारास मतमोजणी केंद्राकडे झाले असता, समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी भुसे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जाऊन शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रात जाऊन विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले. त्यावर कार्यकर्त्यांनी त्यांची केंद्रापासून शिवसेना संपर्क कार्यालयापर्यंत विजयी मिरवणूक काढली.
मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून दादा भुसे यांनी आघाडी घेतली होती. भुसे यांची आघाडी जसजशी वाढत होती. तसतसे भुसे यांच्या मतदान प्रतिनिधींमध्ये आनंद व जल्लोषाचे वातावरण निर्माण होत होते. प्रत्येक फेरीअखेर बाहेर येत ते आपापल्या टेबलावर किती मतदान झाले याची चर्चा करत होते. तसतसा कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावत होता
महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. गेल्या पाच वर्षांत मालेगावात अनेक विकासकामे मार्गी लावली. या सगळ्यांबरोबरच लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिले. त्यामुळेच महायुतीचा विजय झाला. येत्या काळात मालेगाव जिल्हानिर्मितीसह इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
दादा भुसे, आमदार
प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो. प्रतिसादही चांगला मिळाला होता. त्यामुळे मतांमध्ये एवढा फरक असेल, असे वाटले नव्हते, तरीदेखील आम्ही जनमताचा आदर करतो.
बंडूकाका बच्छाव