पाणीयोजनांच्या कामांकडे सीईओंची पाठPudhari FIle Photo
Published on
:
24 Jan 2025, 6:13 am
Updated on
:
24 Jan 2025, 6:13 am
पाथर्डी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर गुरुवारी (दि. 23) तालुक्याचा दौरा केला. यादरम्यान येरेकर यांनी अंगणवाडी, शाळा व जलजीवन योजनेंतर्गत पाणीयोजनांच्या कामांची पाहणी केली. मात्र, तक्रारी झालेल्या आल्हनवाडीसह इतर गावांकडे त्यांनी पाठ फिरविली. स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक तक्रारी असलेल्या गावाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांना नेले नसल्याची चर्चा पंचायत समिती गोटात सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचा कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर गुरुवारी तालुक्यात आले होते. तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. अनेक गावांमध्ये जलजीवन योजनेच्या अपहाराबाबत तक्रारी झाल्या आहेत. आल्हनवाडी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेचे कामा पूर्ण असताना स्थानिक प्रशासनाने जलजीवन योजनेचे सुमारे पावणे दोन कोटी रुपयांची काम हाती घेतली आहेत. आल्हनवाडी योजनेबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. सध्या आल्हनवाडी पाणीयोजना गाजत असतानाच येरेकर यांचा पाहणी दौरा स्थानिक प्रशासनाची धडकी वाढवणारा ठरला.
मात्र, येरेकर यांनी दौर्यात तक्रारदार गावाकडे फिरवलेली पाठ चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक प्रशासनाने येरेकर यांना चुकीची माहिती देत तक्रारी झालेल्या कामांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्याची चर्चा पंचायत समिती वर्तुळात होती.
गुरुवारी येरेकर तिसगाव येथे आले. तेथील त्यांनी इंदिरानगर वस्तीवरील अंगणवाडी व शाळा तपासणी केली. अंगणवाडी येथे वीजपुरवठा नसल्याचे पाहून त्यांनी तत्काळ वीजपुरवठा जोडण्याची आदेश प्रशासनाला दिले. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने मिशन आरंभ योजनेची अंमलबजावणी न केल्याने संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी मढी मार्गे धामणगाव येथील जलजीवन योजनेच्या कामाची पाहणी केली .कामाला गती देऊन तत्काळ योजना कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.
पाथर्डी शहरातील व साकेगाव येथील पंपिंग स्टेशनच्या कामाची पाहणी करीत अधिकार्यांना सूचना दिल्या .दौर्या दरम्यान त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिल सानप, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.