चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं जेतेपद मिळवण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर एक प्रकारे मरगळ आली आहे. कसोटीतही टीम इंडियाची वाताहत झाल्याचं दिसून आलं आहे. कारण दिग्गज समजल्या जाणाऱ्या खेळाडूंनी संघात जागा तर घेतली आहे. पण कामगिरीच्या नावानं बोंब आहे. असं असताना सर्व स्तरातून टीका होत असताना दिग्गज खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये बॅटला धार करण्यासाठी उतरले आहेत. पण इथेही त्यांच्या वाटेला निराशाच आली आहे. नवख्या गोलंदाजांनी रोहित शर्मासह इतर खेळाडूंना दिवसा तारे दाखवले आहेत. रोहित शर्माला तर सूर काही गवसताना दिसत नाही. जम्मू काश्मीरविरुद्धच्या पहिल्या डावात फक्त 3 धावा करता आल्या. तर दुसऱ्या डावात 28 धावा करून बाद झाला. पहिल्या डावात त्याची विकेट उमर नझीरने काढली. त्याचा गोलंदाजीचा सामना करताना रोहित शर्मा चाचपडताना दिसला. 6 फूट 4 इंच उंच असलेल्या उमरने प्रत्येक चेंडूवर रोहित शर्माला चकवलं. त्यानंतर विकेट घेत तंबूचा रस्ता दाखवला. पण या विकेटनंतरही त्याने सेलीब्रेशन केलं नाही. याचं कारण त्याने सामन्यानंतर सांगितलं.
उमर नझीर म्हणाला की, ‘रोहित शर्माची विकेट घेतल्यानंतर मी सेलिब्रेशन केले नाही कारण मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. त्याची विकेट घेणे माझ्यासाठी खूप खास आहे. मी पहिल्यांदाच त्याच्यासमोर गोलंदाजी केली.’ रोहितच्या अपयशामुळे त्याच्या लाल चेंडूच्या कारकिर्दीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत अपयश आलं तर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दिला एक प्रकारे खिळ बसेल, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.
रोहित शर्माने आपला खेळ उंचावत दुसऱ्या डावात 28 धावा केल्या. रोहितने स्क्वेअर लेगच्या षटकारासाठी पुन्हा त्याचा ट्रेडमार्क पुल शॉट दाखवला. विकेटवर ओलावा नसल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. शेवटी जम्मू-काश्मीरचा गोलंदाज आबिद मुश्ताकने रोहित शर्माला ओव्हरमध्ये बाद करून त्याचा डाव संपवला.