नवी दिल्ली : “भारताच्या दोन्ही संघांनी खो खो विश्वचषक जिंकणे हे खेळाडूंच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि क्रीडाप्रेमाचे यश आहे. तुम्ही केवळ विजेतेपद मिळवले नाही तर खो-खो खेळाला जागतिक स्तरावर स्थान मिळवून दिले आहे. सरकार म्हणून आम्ही अशा क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
खो खो विश्वचषक जिंकलेल्या भारतीय पुरुष आणि महिला खो खो संघाच्या खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम मंत्री रक्षा खडसे यांनी दिल्लीत आयोजित केला केला, यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला खो खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशु कुमार मित्तल आणि सरचिटणीस एम.एस.त्यागी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावत देशाचे नाव जगात मोठे केले. सर्व खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे, असे म्हणत खेळाडूंच्या जिद्द, समर्पण आणि चिकाटीची प्रशंसा केली.
यावेळी पुरुष संघ संघाचा कर्णधार प्रतिक वायकर, महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळे आणि इतरही खेळाडूंनी विश्वचषकादरम्यानचा आपला अनुभव सांगितला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने या माध्यमातून जे यश मिळवले त्याचा आपण भाग आहोत, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. या एकूण स्पर्धेदरम्यान देशातील अनेक नागरिकांनी विविध माध्यमातून आम्हाला दिलेला पाठींबा खूप बळ देणारा होता, अशाही भावना खेळाडूंनी बोलून दाखवल्या.
मंत्री खडसे म्हणाल्या की, महाराष्ट्रात उगम पावलेल्या खेळाला पाठिंबा देण्यासाठी आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा विकास करण्यासाठी मंत्रालयाच्या क्रीडा मंत्रालय कटीबद्ध आहे. भारतीय संघाच्या खो-खो विश्वचषकातील विजयाने क्रीडाप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे आणि देशभरातील असंख्य तरुण खेळाडूंना नवी प्रेरणा दिली आहे. हे यश केवळ भारताच्या क्रीडा कौशल्याचा उत्सव नाही, तर पारंपरिक खेळांचे जतन आणि जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित करते, असेही त्या म्हणाल्या.