‘टेनिस विश्वाचा राजा’ म्हणून ओळख असलेला 24 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदांचा मानकरी असलेल्या नोव्हाक जोकोविचचे रौप्य महोत्सवी ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचे स्वप्न दुखापतीने भंग केले. ‘ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचा पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून त्याने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे टेनिसप्रेमींना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनी जोकोविचच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोकोविचने माघार घेतल्याने प्रतिस्पर्धी जागतिक क्रमवारीत दुसऱया क्रमांकावर असलेल्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला वॉकओव्हर मिळाला आणि तो प्रथमच या ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला.
जोकोविचने बुधवारी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिसऱया मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा रंगतदार लढतीत पराभव केला होता. जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधील पुरुष एकेरीतील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने हे विजेतेपद दहा वेळा जिंकले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोविचपुढे झ्वेरेव्हचे आव्हान होते. मेलबर्नच्या रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पहिल्या सेटमध्ये जोकोविचला 7-6 असा पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, स्नायूंच्या दुखापतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, मात्र पहिल्या सेटनंतर आणखी वेदना होऊ लागली. ही वेदना असह्य असल्याने मी सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे मीडियाशी बोलताना जोकोविच म्हणाला.
प्रेक्षकांची विरोधी घोषणाबाजी
जोकोविचने माघार घेतल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर झ्वेरेव्हने त्याचा बचाव केला. झ्वेरेव म्हणाला की, दुखापतीमुळे बाहेर गेल्यास कृपया कोणत्याही खेळाडूला चिडवू नका. मला माहीत आहे की, प्रत्येकजण तिकिटांसाठी पैसे देतो, परंतु नोवाकने गेल्या 20 वर्षांमध्ये खेळासाठी सर्व काही दिले आहे.
झ्वेरेव्हकडे एकही ग्रॅण्डस्लॅम नाही
अलेक्झांडर झ्वेरेव्ह त्याच्या पहिल्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाच्या शोधात आहे. तो पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गतवर्षी ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्य फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.