अभिनेत्री हिना खानला काही महिन्यांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. तिच्यावर सध्या कॅन्सरवरील उपचार सुरू आहेत. या उपचारादरम्यान एका व्यक्तीने हिनाची प्रत्येक पावलावर खंबीर साथ दिली. ती व्यक्ती म्हणजे हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जैयस्वाल. रॉकीसाठी हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर भावूक पोस्ट लिहिली आहे. त्याचसोबत काही फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर केले आहेत. यामध्ये रॉकी हिनाची कशाप्रकारे काळजी घेत आहे, तिची साथ देत आहे.. हे स्पष्ट पहायला मिळतंय. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात त्याच्यासारखा पुरुष असायला हवा, असं हिनाने म्हटलंय.
हिना खानची पोस्ट-
‘मी ओळखत असलेल्या सर्वोत्तम व्यक्तीसाठी.. जेव्हा मी टक्कल केलं, तेव्हा त्यानेसुद्धा टक्कल केलं आणि जेव्हा माझे पुन्हा वाढायला लागले, तेव्हाच त्याने त्याचे केस वाढू दिले. माझ्या मनाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीसाठी, जो मला नेहमी म्हणतो की ‘मी तुझ्या पाठिशी आहे.’ हार मानण्याची शंभर कारणं असतानाही माझ्या बाजूने खंबीरपणे उभं राहणाऱ्या या व्यक्तीसाठी… या निस्वार्थी व्यक्तीला फक्त कसं टिकून राहायचं हेच माहीत आहे.’
हे सुद्धा वाचा
‘आम्ही एकमेकांसोबत अनेक परिस्थितींचा सामना केला. आम्ही खरोखरंच एक आयुष्य सोबत काढलंय आणि एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलोय. कोरोना महामारीच्या काळात आरोग्याच्या आव्हानांना तोंड देताना आम्ही कठीण काळातून गेलो. आम्ही दोघांनीही आमच्या वडिलांना गमावलं. त्या कठीण काळात आम्ही दोघं रडलो आणि एकमेकांचं सांत्वन केलं. त्याला कोरोनाची लागण झाली नव्हती, तरीसुद्धा तो माझ्यासोबत राहत होता. दिवसभर तो तीन-तीन मास्क घालून माझी काळजी घ्यायचा.’
‘विशेषकरून कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तो सर्वकाही सोडून माझी काळजी घेत होता. कोणत्याही डॉक्टरांना भेटण्यापूर्वी प्रश्नावलीची यादी तयार करण्यापासून ते मी योग्य दिशेने पुढे जात आहे का याची खात्री करण्यासाठी त्याच्या बाजूने संशोधन करण्यापर्यंत त्याने सर्वकाही केलंय. माझी किमोथेरपी सुरू झाल्यापासून रेडिएशनमधून जाईपर्यंत, तो मार्गदर्शकाप्रमाणे माझ्यासोबत राहिला. माझ्या क्लिनिंगपासून कपडे घालण्यापर्यंत त्याने सर्वकाही केलंय. माझ्याभोवती त्याने अभेद्य संरक्षणाचं क्षेत्र निर्माण केलंय.’
‘या संपूर्ण प्रवासाने आणि विशेषत: गेल्या दोन महिन्यांनी मला खूप काही शिकवलंय. मला बऱ्याच गोष्टींची जाणीव झाली. रॉकी हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्ती आहे. सर्वकाही सोपं नसतानाही तू माझ्यासोबत आलास, मला सावरलंस आणि माझ्यासोबत असलेल्या सर्वांना सावरलंस. तू मला स्वत:वर प्रेम करायला शिकवलंस. या सर्व गोष्टींमुळे आयुष्यातील अत्यंत कठीण काळातही श्वास घेणं खूप सोपं झालं. मी मनापासून तुझे आभार मानते.’
‘मी तुला कधी दुखावलं असेल तर मला माफ कर. आम्ही दोघं एकत्र हसलो, रडलो आणि एकमेकांचे अश्रू पुसले आहेत. यापुढेही आयुष्यभर आम्ही असेच एकत्र राहू. तू खरंच देवाचा आशीर्वाद आहेस. माझे सर्व डॉक्टर्स आणि हॉस्पीटल स्टाफ त्याला ही गोष्ट बोलले आहेत आणि आज मीसुद्धा बोलते.. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात तुझ्यासारखा पुरूष असायला हवा’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.