कल्याणमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांनी एका मराठी तरुणाला मारहाण केल्याच प्रकरण समोर आलय. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मराठी तरुणाने महात्मा पोलीस चौकीत रिक्षा चालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. “माणूस रोज थकून-भागून येतो. एकतरी सुविधा चांगली आहे का इथे?. एरिया बघा, सगळे परप्रांतीय रिक्षा चालक भरले आहेत. वरती वेश्या व्यवसाय चालू आहे. एकपण लेडीज वरुन जायला मागत नाही, कारण तिथे वेश्या व्यवसाय चालतो. कोणी यावर बोलायला मागत नाही. इथून यायचं, तर रिक्षावाल्यांची गर्दी. आज माझ्यावर काठीने हात उचलला. मी विरोध करायला गेलो, तर 10 रिक्षावाले माझ्या अंगावर आले” असं हा तरुण व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय.
मागच्या महिन्यात डिसेंबरमध्येच कल्याणमध्ये उच्चभ्रू वस्ती एका मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. कल्याण पश्चिमेला उच्चभ्रू सोसायटीत हा वाद झाला होता. दोन अमराठी कुटुंबियांमध्ये भांडण सुरु होतं. या दोन्ही अमराठी कुटुंबियांमधील वाद मिटवण्यासाठी शेजारी राहणारे धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला. धीरज देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात, असे संतापजनक शब्द वापरले. यावेळी या अमराठी कुटुंबाने बाहेरुन गुंड बोलावले व मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली होती. दहीसरमध्ये मनसे स्टाइल
मागच्या आठवड्यात दहिसर येथे एक घटना घडली होती. एका हॉटेलमध्ये मराठी माणूस गेला होता. तिथे परप्रांतीय बाऊन्सर उभे होते. बाऊन्सर आणि मराठी माणूस यांच्यात मराठी बोलण्यावरून वाद सुरू झाला. दोन्ही बाऊन्सर्सनी मराठी बोलण्यास आणि समजून घेण्यास नकार दिला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी दोन्ही बाऊन्सर्सची दखल घेतली. त्यानंतर या दोन्ही परप्रांतीय बाऊन्सरनी मराठीत माफी मागितली. मराठी माणसावर अन्याय होण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत.