प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमधून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी उसळत आहे. दरम्यान सोमवारी अयोध्येतील तुफान गर्दीमुळे दोन भाविकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात एका महिलेचा व एका पुरुषाचा समावेश असून दोघांचेही वय 60 च्या वर असल्याचे समजते.
राममंदिरात जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. अयोध्येत येणारे सर्व रस्ते हे गर्दीने भरले आहेत. सोमवारी या गर्दीत एका महिलेला व पुरुषाला चक्कर आला. त्यांना ज्या ठिकाणी चक्कर आली तिथून हॉस्पिटल अवघे 500 मीटरवर होते मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बराच वेळ लागल्याचे समजते. या दोन्ही भाविकांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जाते.