कुछ होश नहीं रहता, कुछ ध्यान नहीं रहता, इन्सान मोहोब्बत में इन्सान नहीं रहता ! प्रेमात पडलेल्या व्यक्तीला काळ, वेळ, स्थळ कशाचेही भान नसते असं म्हटलं जातं. प्रेमात माणूस वाट्टेल ते करू शकतो. कोणाच्या, कधी प्रेमात पडावं यावरही लोकांचं नियंत्रण नसतं, कोणावरही प्रेम जडू शकतं. एखाद्या महिलेने महिलेशी आणि पुरूषाने पुरूषाशी लग्न केल्याच्या घटनाही हल्ली आपल्या कानावर पडत असतात. पण उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये एक अशीच वेगळी घटना आहे. तेथे एका मैत्रिणीच्या प्रेमात पडलेल्या तरूणीने तिचं लिंगपरिवर्तनच करून घेतलं. आपली जुनी ओळख पुसून सविता आता ललित बनली आहे. नंतर दोघांनीही पळून जाऊन आर्य समाज मंदिरात जाऊन लग्न केलं आणि आता ते एकत्र रहात आहेत. सध्या सगळीकडे त्यांचीच चर्चा आहे.
जेव्हा जयपूर पोलीस हे पूजा नावाच्या मुलीच्या शोधात मथुरेच्या महावनमध्ये पोहोचले तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पूजाला परत जयपूरला नेले आणि त्यानंतर ही प्रेमकथा समोर आली. 31 वर्षीय सविता ही भरतपूरची रहिवासी आहे. एसएससी कोचिंगसाठी ती जयपूरला आली होती. सांगानेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमेश नावाच्या व्यक्तीच्या घरात ती भाड्याने राहू लागली. रमेशची मुलगी तिच्याच वयाची होती त्यामुळे दोघींचीचांगली मैत्री झाली आणि काही काळातच दोघी एकमेकांच्या जवळ आल्या.
लिंग परिवर्तन करून सविता बनली ललित
कोचिंग संपल्यानंतर सविता भरतपूरला परत गेली, पण तिची आणि पूजाची भेट सुरूच राहिली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघींनीही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली आणि आयुष्यभर जोडीदार बनून राहण्याचा निर्णय घेतला. मात्र समाजाच्या बंधनांवर मात करण्यासाठी सविताने मोठे पाऊल उचलले आणि लिंग परिवर्तन करून ती सविताची ललित बनली. यानंतर ते दोघेही पती-पत्नी म्हणून एकत्र राहू लागले. मात्र, पूजाच्या शोधात पोलीस तेथे पोहोचले असता अखेर ही अनोखी प्रेमकहाणी सर्वांसमोर आली.
आर्य समाज वैदिक संस्थेत केला विवाह
पूजाच्या प्रेमात पडलेल्या सविताने 31 मे 2022 रोजी इंदूरमध्ये तिचे लिंग परिवर्तन केलं आणि ती सविताची ललित झाली. यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये सविता आणि पूजाचे आर्य समाज वैदिक संस्थान मंडळ, जयपूर येथे लग्न झाले. पण पूजाने हे गुपित तिच्या घरच्यांपासून लपवून ठेवलं होतं. मात्र त्याच दरम्यान, पूजाच्या वडिलांनी एका मुलासोबत तिचं लग्न ठरवलं. पण हे लग्न टाळण्यासाठी पूजाने आपण बीएड करण्यासाठी भरतपूरला जात असल्याचे वडिलांना सांगितले. 10 जानेवारी रोजी पूजाने भरतपूरला पोहोचून तिचा मोबाईल बंद केला. कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तिचा काहीच शोध लागला नाही.
अशी उघड झाली प्रेमकहाणी
त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी 14 जानेवारी रोजी जयपूरमधील सांगानेर पोलिस ठाण्यात पूजा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिचे मोबाईल लोकेशन ट्रॅक केले असता ते मथुरेच्या महावन पोलीस स्टेशन परिसरात सापडले. शुक्रवारी जयपूर पोलिसांनी तेथे छापा टाकून पूजा आणि ललितला पकडले. अखेर चौकशीत ललितने सांगितले की तो महावन येथील फार्मसी कॉलेजमध्ये काम करतो आणि पूजा त्याच्यासोबत पत्नी म्हणून राहत आहे. पूजानेही पोलिसांना स्पष्टपणे सांगितले की, तिला ललितसोबतच राहायचे आहे. जयपूर पोलिसांनी पूजाला सोबत घेऊन उपनिरीक्षक बाबू लाल यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पर्दाफाश केला. दोघेही प्रौढ आहेत त्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिलं.