Published on
:
27 Jan 2025, 4:26 am
Updated on
:
27 Jan 2025, 4:26 am
प्रयागराज : पुढारी वृत्तसेवा
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यात पवित्र नद्यांच्या संगमामध्ये स्नान करून पाप धुवून पुण्य संपादन करण्याच्या भावनेने भारतासह जगभरातून लाखो भाविक रोज प्रयागराजमध्ये येत आहेत. रोज येणाऱ्या भाविकांचा ओघ अखंड सुरू आहे. आज ४६.६४ लाखाहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले आहे. तर २६ जानेवारी २०२५ पर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र नद्यांच्या संगमामध्ये श्रद्धेची डुबकी लावत स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.
उत्तर प्रदेश सरकारकडून येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या असून, अनेक स्वयंसेवी संस्थांनीही भाविकांच्या सोयींसाठी अनेक लंगर, प्रसादालय, पाणी, वैद्यकीय सुविधा, पार्किंग, राहण्यासाठीची व्यवस्था यासारख्या असंख्य सुविधांची निर्मिती केली आहे. तसेच जगभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोई सुविधांमुळे भक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांना सुरक्षीत स्नानासाठी नद्यांच्या काठावर घाट बांधण्यात आले आहेत. तसेच गोताखोर आणि लोकांच्या मदतीसाठी पोलिस प्रशासनही तैनात करण्यात आले आहे.