महादेव मुंडेंचे कुटुंबीय घेणार पोलीस अधीक्षकांची भेट:खूनाचा तपास परळी पोलिसांकडून अंबाजोगाई पोलिस उपाधीक्षकांकडे वर्ग, बीडमध्ये घडामोडींना वेग

12 hours ago 3
महादेव मुंडे यांची ऑक्टोबर 2023 मध्ये हत्या झाली होती. या खुनातील आरोपी अद्यापही मोकाटच असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तसेच या खून प्रकरणात वाल्मीक कराडच्या मुलाचे नाव घेतले होते. महादेव मुंडे खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास करावा अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर बीडच्या पोलिस अधीक्षकांनी हा तपास पोलिस उपअधीक्षकांकडे वर्ग केला आहे. आता महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आज पोलिस उपअधीक्षकांची भेट घेणार आहेत. महादेव दत्तात्रय मुंडे हे परळी तालुक्यातील भोपळा गावचे रहिवासी होते. पण 2022 च्या आसपास ते अंबाजोगाईत राहण्यास आले. त्यांची 2023 मध्ये परळी तहसीलच्या बाहेर हत्या झाली. त्यांच्या गळ्यावर व गालावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. आर्थिक व्यवहारातून ही घटना घडल्याचा दावा केला जातो. पण वस्तुस्थिती अद्याप बाहेर आली नाही किंवा या प्रकरणात एकाही आरोपीला अद्याप अटक झाली नाही. भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आता परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्येला वाचा फोडली आहे. आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून व्हावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास परळी पोलिस ठाण्यातून काढून घेतला असून बीड पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे वर्ग केला आहे. तपास उपअधीक्षकांकडे वर्ग झाल्यानंतर आज महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची ही भेट होणार आहे. आज सकाळी 11 वाजता महादेव मुंडे यांचे कुटुंबीय अंबाजोगाई येथे पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले यांची भेट घेणार असून ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. नेमके प्रकरण काय? व्यापारी महादेव मुंडे यांचा 22 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या खून प्रकरणाला 14 महिने उलटून गेले, तरी आरोपी फरार असून तपासही झाला नसल्याचे आमदार सुरेश धस म्हणाले होते. या हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे देण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. मात्र, बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास अंबाजोगाई पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवण्याचे आदेश काढले. या खून प्रकरणात मुंबईतील सायबर तज्ञांनी 150 मोबाईल काढले. मात्र बीड पोलिसांनी या मोबाईलची चौकशी केली नसल्याचा आरोप धस यांनी केला होता. या खून प्रकरणात वाल्मीक कराडच्या मुलाचे नाव घेतले जाते. खून झाला त्या घटनास्थळावरून वाल्मीक कराडचा मुलगा सुनील कराडने मोबाईलवर फोन केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. महादेव मुंडे खून प्रकरणात आकाचा सुशील नामक मुलगा आरोपी आहे. त्याच्या अवतीभोवती या प्रकरणातील आरोपी फिरताना दिसतात. महादेवच्या आरोपींना अजून अटक झाली आहे. विशेषतः या प्रकरणी 6 आरोपींची ओळख पटली होती. त्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक सानप हे त्यांना पकडण्यासाठी गेले होते. पण त्यांना पकडू नका. राजाभाऊ फड व आमच्या पक्षात नसलेल्या 5 जणांना आरोपी करा असे आकाने पोलिसांना सांगितले. पण सानप यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यावर आकाने त्यांना परळीतून जाण्यास सांगितले. त्यानुसार सानप तेथून निघून गेले, असे सुरेश धस म्हणाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article