एसटी भाडे वाढीविरोधात ठाकरे गट आक्रमक:आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर उद्या राज्यभरात चक्काजाम आंदोलन
12 hours ago
2
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा स्थापन झालेल्या महायुती सरकारने एसटी महामंडळाच्या तिकीट दरामध्ये वाढ केली आहे. या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता राज्यातील प्रमुख एसटी डेपोजवळ हे चक्काजाम आंदोलन होणार आहे. या माध्यमातून एसटी भाडे वाढीविरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजच चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जनता आधीच महागाईने त्रस्त झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्यावर एसटी महामंडळाच्या भाडेवाडीतून आणखी ताण पडणार आहे, असा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. एसटी महामंडळाने तिकिटाच्या दरामध्ये 14.97 टक्के एवढी भाव वाढ केली आहे. या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. तर उद्या राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देखील पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. मंत्री सरनाईक यांना कल्पनाही नव्हती एस टी महामंडळाच्या वतीने एसटी बसच्या तिकिट दरामध्ये करण्यात आलेल्या दरवाढीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. या संदर्भात त्यांना प्रश्न विचारले असता अधिकाऱ्यांनी भाडेवाडीचा निर्णय परस्पर घेतला असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे एसटी भाडेवाढ लागू झाली तरी परिवहन मंत्र्यांना त्याची साधी कल्पनाही नव्हती का? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. 25 तारखेच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात ही दरवाढ लागू झाली आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ एसटी महामंडळाने आपल्या प्रस्तावात 14.95 टक्के भाडेवाड करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तर ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडे संघटनांनी मुंबईत 3 रुपयांनी दरवाढ करण्याची मागणी केली होती. या दरवाढीमुळे ऑटोरिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये होऊ शकते. टॅक्सी व ऑटोसाठी शेवटची भाडेवाड ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आली होती. एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे वाढीव दर, सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती आदी कारणांमुळे ही ही भाडेवाड करणे गरजचे असल्याचे सांगत एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. मागील 3 वर्षांपासून दरवाढ झाली नाही गत काही वर्षांत डिझेल, सीएनजी, एसटीचे सुटे पार्ट आदी गोष्टींमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षी ही दरवाढ अपेक्षित असते. पण मागील 3 वर्षांपासून ही दरवाढ झाली नव्हती, अशी पुस्तीही मंत्री सरनाईक यांनी यावेळी या दरवाढीचे समर्थन करताना जोडली होती.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)