Published on
:
26 Jan 2025, 6:34 am
Updated on
:
26 Jan 2025, 6:34 am
वाई बाजार, पुढारी वृत्तसेवा
माहूर देवदर्शनासाठी हिंगोली जिल्ह्यातील जवळा बु. येथून पायी दिंडी घेवून आलेल्या भाविकांनी काल (शनिवार) रात्री उपवासाची भगर खाल्ली. यातून तब्बल 52 भाविकांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना माहूर येथे घडली असून विषबाधा झालेल्या भाविकांना काल रात्री उशीरा माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित रूग्णांची प्रकृर्ती स्थीर असून कोणत्याही प्रकारची चिंताजनक बाब नसल्याचे प्रशासनाच्या वतीने तहसिलदार किशोर यादव यांनी सांगितले आहे.
माहूरगडावरील देवदर्शनासाठी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे जवळा (बु.) येथील जवळपास दोनशे भाविकांची पायी दिंडी माहूर येथे दर्शनासाठी आली होती. दरम्यान काल दि. २५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दिंडीतील भाविकांसाठी त्यांनी फराळासाठी भगर केली होती. ती दिंडीतील जवळपास सर्वच भाविकांनी खाल्ली. परंतू रात्री बारानंतर भगर खालेल्या बहुतांश भाविकांना मळमळ व उलटीचा त्रास होवू लागल्याने मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्यांना माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण वाघमारे यांच्यासह डॉ. पेदापेल्लीवार, डॉ. वसीम जावेद, डॉ. अंबेकर व त्यांच्या टिमने त्यांच्यावर उपचार केले. आज दि. २६ रोजी भल्या पहाटे दिंडीतील आणखी काही भाविकांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश्वर माचेवार यांच्या मार्गदर्शनासाठी डॉ. पुडलिक भुरके, डॉ. उमा गोसलवाड, डॉ. दिपक गरकर, डॉ. अमोल बुरसे, डॉ. वैभव लहाने तसेच तालुका आरोग्य सहाय्यक सयाजी जोगपेठे त्याचबरोबर सुलोचना राठोड, विशाल चव्हाण यांच्या वैद्यकीय पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच माहूरचे तहसिलदार किशोर यादव यांच्यासह माहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार शिवप्रकाश मुळे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी आदींनी रूग्लयातील रूग्णांची भेट घेवून विचारपुस केली. दरम्यान सर्व रूग्णाची प्रकृर्ती स्थीर असून चिंतेचे कारण नसल्याचे प्रसासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.