Published on
:
27 Jan 2025, 3:57 am
Updated on
:
27 Jan 2025, 3:57 am
जळगाव | मुक्ताईनगर चिखली येथील भारत निर्माण योजनेत अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन महिला सरपंचांसह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली गावासाठी भारत निर्माण योजनेच्या अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. यात तत्कालीन महिला सरपंचांसह इतरांनी खोटे दस्तऐवज तयार करून अस्तित्वात नसलेल्या खोट्या लोकांची समिती तयार करून बनावट स्वाक्षऱ्या करत तब्बल 16 लक्ष 92 हजार 68 रूपयांचा अपहार केला होता. हा प्रकार सन 2008 ते 2012 दरम्यान घडला होता. या प्रकरणी चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार नामदेव काकडे यांनी पाठपुरावा करून मुक्ताईनगर न्यायालयात दाद मागितली होती. यावर कोर्टाने कलम 156 (3) अन्वये चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या अनुषंगाने चिखली येथील तत्कालीन महिला सरपंच आणि युसुफखान गुलामखान फकिर या दोघांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकामध्ये गुरनं 0027/2024 अंतर्गत भादंवि कलम 420, 406, 456, 466, 468, 471 व 409 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.