अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील त्याच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे. मात्र महाराजांच्या भूमिकेसाठी मराठी कलाकाराची निवड झाली असती, तर चांगलं वाटलं असतं, अशी प्रतिक्रिया एका मराठी अभिनेत्याने दिली आहे. ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊतने हे मत मांडलं आहे.
विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल तुझं काय मत आहे, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “ट्रेलर तर खूपच कमाल आहे. विकी कौशल हा अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे. परंतु, महाराजांची भूमिका करण्यासाठी मराठी अभिनेत्याला निवडलं पाहिजे होतं, अशी माझी इच्छा आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या या चित्रपटात इतक्या मोठ्या पडद्यावर ती भूमिका पाहणं एक वेगळाच अनुभव असता. कदाचित मराठी इंडस्ट्री आणि मराठी कलाकार म्हणून आपण कुठे तरी कमी पडतोय. लहान तोंडी मोठा घास पण प्रेक्षक म्हणून आणि मराठी इंडस्ट्रीचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की ती भूमिका एखाद्या मराठी कलाकाराने साकारायला पाहिजे होती किंवा आगामी काळात मराठी कलाकाराने अशा भूमिका साकाराव्यात. चंदु चॅम्पियन असो, मुंज्या असो किंवा महाराजांची भूमिका असो.. मराठी व्यक्तीने अशा भूमिका केल्या पाहिजेत असं मला वाटतं.”
हे सुद्धा वाचा
अजिंक्यने मांडलेल्या या मतावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘मी सहमत आहे, चित्रपट हिंदी असला तरी 50-60 टक्के तरी मराठी कलाकारांना घेतलं पाहिजे होतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘मराठी कलाकार पॅन इंडियाचं यश मिळवू शकत नाहीत. महाराजांची किर्ती सर्वत्र पोहोचणं महत्त्वाचं आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. या व्हिडीओमध्ये अजिंक्य अधून मधून इंग्रजी बोलत असल्याने त्यावरूनही नेटकऱ्यांनी टोला लगावला आहे. ‘स्वत: मराठी असून इंग्रजी झाडततोय आणि कलाकार हा कलाकार असतो मग तो मराठी असो किंवा हिंदी. महाराजांचा इतिहास जगासमोर येणं महत्त्वाचं आहे’, असं आणखी एका युजरने लिहिलं आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘मराठी-हिंदी-नॉन मराठी काय चालू आहे? चित्रपटाची कास्टिंग लोकांच्या मतांवरून नाही तर प्रतिभेवरून होते. कोणत्याच मराठी कलाकाराने या भूमिकेसाठी अर्ज केला नसेल किंवा त्यांची निवड झाली नसेल याची मला खात्री आहे.’ तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, ‘आपण इथे मराठी का अमराठी अभिनेता हा भेद करण्यापेक्षा अभिनय, मांडणी किती छान असेल हे पहावं. संकुचित वृत्तीपेक्षा थोडे व्यापक विचार करावेत.’