उत्तराखंडमध्ये माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. याच वादातून माजी आमदाराने विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दोन्ही आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड विधानसभेचे भाजप नेते, माजी आमदार कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन आणि रुडकी मतदारसंघातील अपक्ष आमदार उमेश कुमार यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर वाद सुरू होता. या वादात आमदारांसोबत त्यांचे सहकारी देखील सहभागी झाले होते. दरम्यान हा वाद इतका विकोपाला गेला की, माजी आमदार कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन आपल्या समर्थकांसह विद्यमान आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी गोळीबार केला. तसेच, या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. यावेळी आमदार उमेश कुमार कार्यालयात उपस्थित नव्हते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शूटआउट एट हरिद्वार…
फ़िल्मी नहीं,सब ओरिजिनल है।
बस व्यवस्था का लुत्फ़ उठाइये….#Uttarakhand pic.twitter.com/HfyRX5ZEFW
— ꜱʜɪᴠ ᴮᴴᵁ (@ShivBHU) January 26, 2025
दरम्यान, माजी आमदार कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन आणि विद्यमान आमदार उमेश कुमार या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोवाल यांनी दिली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या समर्थकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असल्याचे डोवाल यांनी सांगितले.
माजी आमदार कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन यांची फायरिंगमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वीही त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यादरम्यान ते हातात शस्त्र आणि पिस्तुल घेऊन नाचताना दिसले. अशा कारणांमुळे त्यांनी आमदारकीही गमावली होती.