Published on
:
27 Jan 2025, 3:45 am
Updated on
:
27 Jan 2025, 3:45 am
शिरढोण : विद्युत खांब तसेच वाहिनीला अडथळा ठरणार म्हणून शिरढोण (ता. शिरोळ) येथे महावितरण विभागाच्या सांगण्यावरून ठेकेदाराने विनापरवाना ५ डेरेदार झाडांची कत्तल केल्याची घटना उघडकीस आली आहे. केवळ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याऐवजी संबधीत ठेकेदार विशाल अक्कोळे यांनी निम्म्यातूनच झाडांची कत्तल केल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे संबधीत अधिकाऱ्यांसह, ठेकेदार तसेच झाडे तोडलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमीतून होत आहे.
महावितरण विभागाच्या वतीने येथील माळभाग परीसरातील मुख्य रस्त्यालगत नवीन १५ विद्युत खांब बसविण्यात आले आहेत. दरम्यान रस्त्याच्या कडेला पूर्वीपासून डेरेदार झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सदरची झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत आहेत. मात्र ठेकेदारने वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती अथवा परवानगी न घेता उदगाव येथील शहाजी नामक ठेकेदाराकडून सदरची झाडे तोडून घेतली असून तोडलेली झाडे ट्रॅक्टर ट्रॉलीतून घेऊन गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. दरम्यान येथील महावितरण अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी बगल मारली आहे. या प्रकरणात ठेकेदार अक्कोळे हे उडवाउडवीची उत्तरे देत असून याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामध्ये आंबा, उंबर, रेन्ट्री तसेच अन्य झाडांचा यामध्ये समावेश आहे. शिवाय अनेक डेरेदार झाडांच्या फांद्या चुकीच्या पद्धतीने छाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबधीत अधिकारी, ठेकेदार, तसेच विनापरवाना झाडे तोडणाऱ्या त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, एकीकडे शासन शतकोटी वृक्ष लागवड योजना राबवत असताना विद्युत वहिनीला अडथळा ठरणार म्हणून अनेक वर्षाची जूनी झाडे विनापरवाना तोडली जात आहेत. यामुळे वृक्षप्रेमीतून संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असणाऱ्या झाडांची कत्तल झाली असेल तर संबधीत महावितरण विभागाला नोटीस पाठवण्यात येणार आहे.तसेच विनापरवाना झाडांची कत्तल केल्याप्रकरणी संबधीतावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- आर. बी. चाचुर्डे (सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, जयसिंगपूर)