महाकुंभमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला. ती किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनली. मात्र तिच्या महामंडलेश्वर बनण्यावरून वाद सुरू झाला आहे. किन्नड अखाड्याच्या महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी अखाड्याच्या या निर्णयावरून प्रश्न उपस्थित केला आहे. ममता कुलकर्णीचं डी-कंपनीशी कनेक्शन असल्याचं त्यांनी म्हटलंय. अशातच कोणतीही चौकशी न करता तिला महामंडलेश्वर का बनवलं गेलं, असा सवाल त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर किन्नर अखाडा हा किन्नरांसाठी आहे, मग त्यात एका महिलेला जागा का दिली, असंही हिमांगी सखी यांनी विचारलंय.
याविषयी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “किन्नर अखाडा कोणासाठी बनवलं गेलं होतं? किन्नरांसाठी आणि आता त्यात एक महिलेला स्थान दिलंय. मी म्हणते जर तुम्हाला किन्नर अखाड्यात एका महिलेला स्थान द्यायचं असेल तर त्या अखाड्याचं तुम्ही नावंच बदलून टाका. दुसरं कोणतंही नाव ठेवा. ममता कुलकर्णीचं डी-कंपनीशी कनेक्शन होतं. ती ड्रग्जच्या आरोपाखाली तुरुंगातही गेली होती. ही गोष्ट संपूर्ण जगाला माहीत आहे. तरीसुद्धा तुम्ही तिला दीक्षा देऊन महामंडलेश्वरचं पद देता. तेसुद्धा कोणत्याही शिक्षेशिवाय. एखाद्याला तुम्ही दीक्षा देऊन इतक्या मोठ्या पदावर बसवता तेव्हा तुम्ही समाजाला काय देत आहात? कोणत्या प्रकारचा गुरू तुम्ही समाजाला देत आहात, हे मला जाणून घ्यायचं आहे. मी आपल्या संतांचा किंवा समाजाचा विरोध का करू? पण काही लोकांना आरसा दाखवण्याची गरज असते.”
“जर तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला आरसा दाखवावाच लागेल. ममता कुलकर्णीचा पट्टाभिषेक केला आणि तिला महामंडलेश्वर बनवलं. तिचं मुंडनसुद्धा केलं नाही, फक्त एक जटा कापली. संन्यास दीक्षेसाठी हे काही कारण असतं का? सर्वांत आधी तिचा इतिहास पहायला होता. डी-कंपनीसोबत तिचे संबंध होते. अचानक ती भारतात आली आणि तिचे व्हिडीओ व्हायरल झाले. ती अचानक कुंभमध्ये प्रवेश करते. अचानक प्रकट होते आणि महामंडलेश्वरचं पदसुद्धा मिळतं. यामागची कारणं काय आहेत, या तपासाचा विषय आहे. मी या गोष्टीची निंदा करते,” अशा शब्दांत हिमांगी यांनी टीका केली.
हे सुद्धा वाचा
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये ममताने शुक्रवारी 24 जानेवारी रोजी तिने संन्यास घेतला. संन्यास घेण्यापूर्वी ममताने स्वत:चं पिंडदान केलं आणि त्यानंतर तिचा पट्टाभिषेक पार पडला. पट्टाभिषेक प्रक्रियेदरम्यान ममता कुलकर्णी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.