Published on
:
24 Jan 2025, 4:53 pm
Updated on
:
24 Jan 2025, 4:53 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा सलामीचा जोडीदार यशस्वी जैस्वाल यांनी रणजी ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा निराशा केली. जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध मुंबई क्रिकेट संघाकडून खेळणारे दोन्ही दिग्गज फलंदाज पहिल्या डावाप्रमाणे दुसर्याही डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. अष्टपैलू शार्दूल ठाकूरने मात्र शानदार शतक ठोकत सामन्यात मुंबईचे आव्हान जिवंत ठेवले. पहिल्या डावात अर्धशतक करणार्या शार्दूल दुसर्या डावात 113 धावांवर नाबाद असून त्याने आठव्या विकेटसाठी तनुषच्या साथीने 150+ ची भागीदारी करून मुंबईची आघाडी 188 धावांपर्यंत वाढवली.
मुंबईला पहिल्या डावात 120 धावांत रोखल्यानंतर जम्मू-काश्मीर संघाने पहिल्या डावात 206 धावा केल्या. पहिल्या डावात 86 धावांनी पिछाडीवर पडलेल्या मुंबईची दुसर्या डावातही घसरगुंडी उडाली. त्यांची अवस्था 7 बाद 101 झाली असताना शार्दूल मात्र ठाकूरसारखा रणांगणात उभा राहिला. त्याने शतक झळकावत 173 धावांची अभेद्य खेळी उभारली.
रोहितला पहिल्या डावात उमर नजीरने त्याला अवघ्या 3 धावांवर बाद केले, पण दुसर्या डावात रोहितने त्याच उमरला उत्तुंग षटकार ठोकला. त्यानंतर आकिब नबी आणि युद्धवीर सिंगच्या गोलंदाजीवर आणखी दोन शॉटस् सहज मारून आपला सर्वोत्तम फॉर्म दाखवला, पण तो त्याचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. 35 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 28 धावा काढल्यानंतर तो युद्धवीर सिंगचा बळी ठरला.
जैस्वालही दुसर्या डावात फेल गेला. त्याला युद्धवीरनेच बाद केले. जैस्वालने 51 चेंडूंत 26 धावा केल्या. पहिल्या डावात त्याला फक्त 4 धावा करता आल्या होत्या.
37 वर्षीय रोहित बर्याच काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या बॅटने धावांचा दुष्काळ अनुभवला. त्यामुळे आपला फॉर्म परत मिळवण्याच्या उद्देशाने तो एक दशकानंतर रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. समोर जम्मू-काश्मीर सारख्या संघाचे आव्हान होते, पण या संघाविरुद्धही रोहितची फलंदाजी फ्लॉप ठरली.
शार्दूल ठाकूरची तनुषच्या साथीने 150+ची भागीदारी
जम्मू-काश्मीर विरुद्धच्या लढतीत भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा, टीम इंडियातील स्टार बॅटर यशस्वी जैस्वाल या जोडीने मुंबईच्या डावाची सुरुवात केली. दोन्ही डावांत या दोघांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. मुंबई संघाचा कर्णधार अंजिक्य रहाणे आणि श्रेयस अय्यरही अगदी स्वस्तात माघारी फिरले. स्टार बॅटिंग ऑर्डरचा भरणा असलेला मुंबईचा संघ 7 बाद 101 असा अडचणीत असताना शार्दूल ठाकूरने पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगच्या जोरावर संघाला संकटातून बाहेर काढणारी खेळी करून दाखवली. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करून मुंबईची लाज राखणार्या शार्दूल ठाकूर दुसर्या सामन्यात कमाल केली. त्याने तनुष कोटियनच्या साथीने मुंबई संघाचा डाव सावरला. या जोडीने आठव्या विकटसाठी 150 पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचली.
मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांच्यात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या दुसर्या दिवशी जोरदार नाट्य पाहायला मिळाले. सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या झेलवरून वाद झाला. श्रेयस अय्यरने पॅव्हेलियनमध्ये परतण्याऐवजी त्याने मैदानावरच अंपायरशी वाद घालण्यास सुरुवात केली.
श्रेयस अय्यरची पंचाशी हुज्जत
जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीचा चेंडू श्रेयस अय्यरच्या बॅटची कड घेऊन विकेटकीपर कन्हैया वाधवनकडे गेला. त्याने सूर मारून तो पकडला, पण हा झेल योग्य पद्धतीने घेतला गेला नाही, असे अय्यरचे मत होते. त्यामुळे पंचांनी आऊट दिल्यानंतरही तो नाराजी व्यक्त करत होता. त्यानंतर रहाणेला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्याने आपली नाराजी देखील व्यक्त केली आणि मैदानावरील अम्पायर एस. रवी यांच्याशी या झेलबद्दल चर्चा केली. मात्र प्रदीर्घ चर्चा होऊनही अम्पायर त्यांचे म्हणणे मान्य करण्यास तयार नव्हते. ज्यामुळे त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला. यानंतर अय्यर रागाने ड्रेसिंग रूमकडे गेला.