बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहेत. त्यातच आता संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहेत. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या ठिकाणी हा मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईत होणाऱ्या या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी होणार आहेत.
संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी आणि त्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे. या मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय बीडच्या मस्साजोगमधून रवाना झाले आहेत. उद्या मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख सहभागी होणार आहेत. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मस्साजोगमधून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे.
वैभवी देशमुख काय म्हणाली?
उद्या शनिवारी २५ जानेवारी २०२५ मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचे स्थान मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असे असणार आहे. माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला आहे, त्यांच्या आधी ज्या कोणावर अन्याय झाला आहे आणि जे लढा उचलू शकले नाहीत त्यासाठी आम्ही लढा उभारत आहोत. तसाच एक लढा आम्ही मुंबईत उभारत आहोत. गेल्या मोर्चात तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी झाला होतात. तसंच तुम्ही या मोर्चातही सहभागी व्हा, अशी मी विनंती करते. आम्ही येतोय तुम्ही पण या, असे आवाहन वैभवी देशमुख यांनी व्हिडीओद्वारे केले आहे. स्व. संतोष देशमुख व स्व.सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्या…! मोठया संख्येने उपस्थित रहा..! अभी नही, तो कभी नहीं..! अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कृष्णा आंधळे फरार घोषित
दरम्यान संतोष देशमुख खूनाचा छडा लावण्यासाठी पोलीस, एसआयटी आणि सीआयडी काम करत आहे. सुरुवातीला हा तपास पोलीसच करत होते. पण बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या मागणीनंतर एसआयटी स्थापन करण्यात आली. तसेच हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिख घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला. पण कृष्णा आंधळेचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो अजून सापडलेला नाही. त्याच्यावरही मकोका लावण्यात आला. आता त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे.