Published on
:
24 Jan 2025, 5:30 pm
Updated on
:
24 Jan 2025, 5:30 pm
गडचिरोली : खर्रा खाण्यावरुन एका इसमास काठीने मारहाण करणाऱ्या तीन भावंडांना वर्षभर परिविक्षाधीन कालावधीसह ३ हजार रुपये दंडाची शिक्षा चामोर्शीच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सुनावली.
नरेश परिमल हलदर, अनपुल परिमल हलदर व अनंत परिमल हलदर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. १० जुलै २०२० ला रात्री ८ वाजताच्या सुमारास खर्रा खाण्यासाठी नरेश, अनपुल आणि अनंतर हलदार घराबाहेर आले. त्यानंतर नरेश हलदर याने राकेश जदुनाथ अधिकारी यास काठीने मारहाण केली. यामुळे राकेश अधिकारी याचे पाय, छाती, कंबर व उजव्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर अनपुल व अनंत हलदर यांनीही राकेशला मारहाण केली. राकेश अधिकारी यांनी घोट पोलिस मदत केंद्रात फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी परिमल, अनपुल व अनंत हलदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिघांनाही अटक केली. प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हवालदार चंचल सोरते यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे तीन साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर आरोपी आणि फिर्यादी यांनी आपसी तडजोड केली. चामोर्शीचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी वाय.जे.वळवी यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपींच्या वर्तणुकीत बदल होऊन त्यांनी पुन्हा भांडण करु नये, याकरिता त्यांना एक वर्ष परिविक्षाधीन कालावधी व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिवाय भरपाई म्हणून राकेश अधिकारी यास ३ हजार रुपये देण्याचेही आदेश दिले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एस.एम.सलामे यांनी काम पाहिले.