नागपूरची अक्षरा करणार पंतप्रधानांशी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार आहे.
Published on
:
24 Jan 2025, 5:19 pm
Updated on
:
24 Jan 2025, 5:19 pm
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून यंदाही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी नागपुरातील एकमेव विद्यार्थिनी अक्षरा इटनकर हिची निवड झाली आहे. तिच्या या निवडीकरिता माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी तिचे अभिनंदन केले.
अक्षरा ही शहरातील एम.के.एच. संचेती पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजची इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेते. अक्षरा ही २५ ते २९ जानेवारी २०२५ या कालावधीत या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळेतील एका महिला शिक्षीकेसह नवी दिल्लीत जाणार आहे. पंतप्रधान मोदी घेत असलेल्या या विशेष कार्यक्रमाची ही ७ वी आवृत्ती असणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या या कार्यक्रमाची विद्यार्थी आणि पालकांमध्ये विशेष क्रेझ असल्याचे नेहमीच पाहायला मिळते. त्यांचा हा कार्यक्रम भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या कार्यक्रमात बोर्डाच्या परीक्षांमुळे येणारा ताण, तो टाळण्याचे मार्ग, मुक्तपणे परीक्षा देण्याचे गुण अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांना संबोधित करता येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही देणार आहेत. यावेळी उपशिक्षणाधिकारी सुशील बनसोड, शाळेचे संचालक अमित येनुरकर, प्राचार्या बिंदू जोसेफ, उपप्राचार्या शितल कथाळे तसेच अक्षराचे पालकही उपस्थित होते.