प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
:
24 Jan 2025, 5:01 pm
Updated on
:
24 Jan 2025, 5:01 pm
पालघर,पुढारी वृत्तसेवा : पालघर शहरातील लोकमान्य पाडा प्रभागामध्ये राहणाऱ्या दोन गरीब कुटुंबाच्या घरांना आग लागल्याने दोन्ही घरे आगीत जळून खाक झाली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुधीर कोंड्या धापशी व गीता धापशी यांची ही घरे असल्याचे स्थानिकांनी सांगितले. आग लागल्याचे कारण अस्पष्ट आहे.
सुधीर धापशी व त्यांची पत्नी आपल्या कच्च्या घरात राहत होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते शेजाऱ्याकडे गेले होते. याच दरम्यान घरातून धूर येऊ लागला. हे स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धावाधाव केली व घराला आग लागल्याचे निदर्शनास आले. आग लागल्याचे कळताच स्थानिक तरुणांनी तातडीने पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढत चालली होती. याच दरम्यान पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्धा तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलासह महावितरण विभाग, स्थानिक माजी नगरसेवक अमोल पाटील व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या प्रसंगावधानामुळे आगीवर वेळीच नियंत्रण आणणे शक्य झाले.