दरवर्षी संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. ह्या दिवशी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठी परेड राजपथ मार्गावरून निघते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनेकजण परेड पाहण्याचे प्लॅन करत असतात. यासाठी अनेकांनी परेडच्या ठिकाणाची तिकिटे आधीच बुक करतात आणि आपल्या कुटुंबासह किंवा मित्रांसह परेडला जाण्याची तयारी केलेली असते. मात्र परेड पाहण्यासाठी तुम्ही जर तुमच्या सोबत या गोष्टी बाळगल्या तर तुम्हला परेड पाहता येणार नाही. नेमकं परेडच्या वेळी काय घेऊन जाऊ नये यासाठी ही बातमी तुमच्यासाठी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडदरम्यान सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. याअंतर्गत परेडच्या ठिकाणी अनेक गोष्टींना बंदी आहे. त्यामुळे तुम्हाला याबाबत माहिती असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला परेड ठिकाणी जात येणार नाही.
प्रजासत्ताक दिनाची परेड किंवा बीटिंग रिट्रीट पाहण्यासाठी तुमच्याकडे तिकीट असणे आवश्यक आहे; त्याचबरोबर जर तुमचं ओळखपत्र सोबत नसल्यास परेड किंवा बीटिंग रिट्रीट सोहळ्यात सहभागी होता येत नाही. यंदा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो परेडचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय देशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे
परेडच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाने अनेक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. तर तुम्ही जेव्हा परेड बघण्यासाठी जात तेव्हा तुमच्या तिकिटासोबत तुम्हाला तुमचा फोटो असलेलं ओळखपत्र (आयडी) सोबत ठेवावे लागणार आहे. तिकीट आणि ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला परेड ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.
परेडच्या ठिकाणी या गोष्टी आत घेऊन जाण्यास प्रतिबंध
खाण्या-पिण्याच्या वस्तू
बॅग, ब्रीफकेस
रेडिओ, ट्रान्झिस्टर, टेप रेकॉर्डर, पेजर
कॅमेरा, दुर्बिणी, हॅण्डीकॅम
ज्वलनशील पदार्थ
सिगारेट, बीडी, लाइटर
अल्कोहोल, परफ्यूम किंवा कोणत्याही प्रकारचे स्प्रे
धारदार शस्त्र, तलवार, स्क्रूड्रायव्हर
डिजिटल डायरी, पाम टॉप कॉम्प्युटर, पॉवर बँक, मोबाइल चार्जर, हेडफोन
रिमोट कंट्रोल कार, थर्मास फ्लास्क, पाण्याची बाटली
रेझर, कात्री, छत्री
प्रोटोकॉलचे पालन करणे बंधनकारक
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी अनेक प्रोटोकॉल आहेत जे प्रत्येक व्यक्तींनी परेड ठिकाणी पाळले पाहिजेत. या काळात अनधिकृत फोटो काढणे आणि व्हिडिओग्राफीवरही बंदी असणार आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये याबाबत कडक नियम प्रस्थापित करण्यात आले आहेत. यासाठी तुम्ही परेड बघायला जाताना या नियमाचे पालन करा.
प्रजासत्ताक दिनी मेट्रोचा बदललेला नियम
दिल्ली येथे नियमित दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून मेट्रो धावते. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेड असल्याने मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी पहाटे चार वाजल्यापासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे, जेणेकरून कर्तव्य पथाकडे जाणाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी तुम्ही थेट मंडी हाऊस किंवा केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोने जाऊ शकता. तेथून कार्तव्य पथ १० मिनिटांच्या अंतरावर आहे.