येवला : तरुणांचा यंदाच्या मतदानात उत्साह असा ओसंडून वाहत होता.(छाया : अविनाश पाटील)
Published on
:
21 Nov 2024, 9:28 am
Updated on
:
21 Nov 2024, 9:28 am
येवला : मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या येवला-लासलगाव मतदारसंघात मतदानाची चांगली चुरस पहावयास मिळाली. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यातील खरवंडी येथे मंत्री भुजबळ आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. सायंकाळी पाचपर्यंत 68.69 टक्के मतदानाची नोंद झाली असून, त्यात मतदानाच्या वेळेपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
येवला : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदानाची खूण दर्शविताना माणिकराव शिंदे यांचे कुटुंब,(छाया : अविनाश पाटील)
येवला-लासलगाव मतदारसंघात सकाळपासूनच विविध ठिकाणी नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे याबाबत कार्यकर्ते आणि नेते यांच्याकडून आवाहन करण्यात येत होते. मतदान करण्यासाठी प्रथमच मतदान करणार्या नवमतदारांनी मोठी गर्दी केली होती. मतदान केंद्राबाहेर सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढून हे नवीन मतदार सोशल मीडियात मतदान करण्याची आवाहन करत होते. मतदारसंघात एक, 16 हजार 573 पुरुष, तर एक लाख सात हजार 780 महिला असे एकूण दोन लाख 24 हजार 353 मतदार असून, सायंकाळी पाचपर्यंत 68.69 टक्के मतदानाची नोंद झाली असून, त्यात मतदानाच्या वेळेपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
येवला : शाळेच्या मतदान केंद्रावर झालेली गर्दी. (छाया : अविनाश पाटील)
विंचूरला 71.23 टक्के मतदान
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विंचूर येथे 71.21 इतके मतदान झाले. सकाळी मतदान केंद्रांवर गर्दी कमी प्रमाणात होती. मात्र, दुपारी दोननंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. विंचूर येथे 10 बूथ होते. एकूण 9937 पैकी 7077 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
भुजबळांचे 20 वर्षांत पहिल्यांदा मतदान
वीस वर्षांत प्रथमच छगन भुजबळ यांनी येवला शहरातून मतदान केले. जनता महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात त्यांनी मतदान केले तर माणिकराव शिंदे यांनी सहकुटुंब कालिका मंदिर प्राथमिक शाळा मतदान केंद्रामध्ये मतदान केले. नाशिक विभागीय शिक्षक आमदार मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार किशोर दराडे यांनी स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे असलेल्या मतदान केंद्रात मतदान केले.