Published on
:
21 Nov 2024, 1:05 pm
Updated on
:
21 Nov 2024, 1:05 pm
नागपूर : पूर्व विदर्भात काही मतदारसंघात 74 टक्क्यांपर्यंत मत टक्का वाढला असल्याने तो कुणाला सुखद तर कुणाला जोरदार धक्का देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. रांगा लावून मतदानासाठी आलेल्या लाडक्या बहिणी विशेष उत्साहात असल्याने त्या देवाभाऊ अर्थात भाजपच्या पाठीशी राहणार की परिवर्तनाच्या, महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या पाठीशी राहतात हे शनिवारीच उघड होणार आहे. विदर्भात 62 पैकी 36 मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढती आहेत.
अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि रामटेकमध्ये दोन्ही शिवसेना परस्परांसमोर आहेत. मोर्शीत महायुतीचे भाजप राष्ट्रवादी पक्ष समोरासमोर आहेत.लोकसभेचा विचार करता महाविकास आघाडीला 7 तर भाजप शिवसेना महायुतीला तीन जागा मिळाल्या. विदर्भात 48 मतदार संघात महायुतीची पिछेहाट झाली होती. पूर्व विदर्भात 18 मतदारसंघ तर उर्वरित पश्चिम विदर्भात होते. मात्र, लाडकी बहीण योजना भाजपसाठी गेमचेंजर ठरू शकते. संघ परिवाराचे मदतीने, शीर्षस्थ नेत्यांच्या मार्गदर्शनात मध्यप्रदेशच्या नेत्यांची मोठी यंत्रणा नागपुरात या नियोजनात गुंतली होती. संविधान रक्षणपासून तर इतरही मुद्द्यांवर रणनीतीनुसार काम झाले.(Maharashtra assembly polls)
दरम्यान, परंपरागत मतांच्या भरवशावर दमदार कामगिरी करणारी काँग्रेस एकसंघपणे लढत असल्याचे चित्र उभे करण्यात कमी पडल्याचे दिसले.गेल्यावेळी विदर्भाचे पक्षीय बलाबल भाजप 29, शिवसेनेच्या 4, राष्ट्रवादी काँग्रेस 6 , काँग्रेस 15 आणि अपक्ष 8 याप्रमाणे होते. जिल्हानिहाय सरासरी मतदान लक्षात घेता पूर्व विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा 70 ते 75 टक्क्यांवर मतदान झाले.राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात टक्केवारी कमी असली तरी मत टक्का वाढला. ग्रामीण भागात सोयाबीन व इतर शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी व शहरात युवकांमध्ये काहीसा महागाई,बेरोजगारी संदर्भात संताप दिसला. नागपूर जिल्ह्यातील सावनेर, रामटेक, काटोल येथे काट्याची टक्कर होईल. गेल्या दोन दिवसातील घडलेल्या राजकीय घडामोडीचे देखील पडसाद आजच्या मतदानावर परिणाम करणारे ठरू शकतात असे विविध मतदारसंघात फिरताना जाणवले.