विटा : खानापूर मतदारसंघातील विजयानंतर सुहास बाबर यांनी मतदारांचे आभार मानले. यावेळी अमोल बाबर, तानाजी पाटील, सुहास शिंदे, सुशांत देवकर उपस्थित होते.Pudhari File Photo
Published on
:
24 Nov 2024, 12:03 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:03 am
विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना-महायुतीचे उमेदवार सुहास अनिल बाबर यांनी विक्रमी 78 हजार 117 मताधिक्य घेत बाजी मारली. बाबर यांना 1 लाख 53 हजार 177 मते मिळाली. महाविकास आघाडीचे वैभव सदाशिव पाटील यांना 75 हजार 60, तर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना केवळ 13 हजार 947 मते मिळाली. देशमुख यांची अनामत रक्कम जप्त झाली. निकालानंतर विट्यासह संपूर्ण मतदारसंघात बाबर समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत विजयोत्सव साजरा केला.
खानापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून विटा येथील बळवंत महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात पार पडली. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी मतमोजणी प्रक्रियेचे नियोजन केले. खानापूर विधानसभा मतदारसंघात 71.27 टक्के मतदान झाले होते. तब्बल 2 लाख 50 हजार 160 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना-महायुतीकडून सुहास बाबर, राष्ट्रवादी-महाआघाडीकडून वैभव पाटील, अपक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह 14 उमेदवार रिंगणात होते. एकूण 20 टेबलांवर ईव्हीएमची, तर दहा टेबलांवर टपाली आणि सैनिकांची मतमोजणी झाली. सतरा फेर्यांमध्ये ईव्हीएममधील मतमोजणी झाली. यापैकी दोन मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने त्या मशीनची मोजणी थांबवण्यात आली. उर्वरित मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली.
टपाली मतांमध्ये बाबर यांना 595 मतांची आघाडी
सुरुवातीपासूनच टपाली मतांमध्ये सुहास बाबर आघाडीवर असल्याचे दिसून आले. टपाली मतदानात 2 हजार 490 मतदान झाले होते. यामध्ये दोन फेर्यात मतमोजणी पार पडली. टपाली मतात सुहास बाबर यांना 1 हजार 235, वैभव पाटील यांना 640, तर अपक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना 413 मते मिळाली. टपाली मतांमध्ये बाबर यांनी 595 मतांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे टपाली मतांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संग्राम माने यांना 23 मते मिळाली, तर अवैध मतांची संख्या 81 होती.
पहिल्या फेरीपासूनच बाबर यांची दणक्यात सुरुवात झाली. पहिल्या फेरीत नागेवाडी जिल्हा परिषद गटातच त्यांना तब्बल 7 हजार 270 मतांची आघाडी मिळाली. या फेरीत सुहास बाबर यांना 10 हजार 360, तर वैभव पाटील यांना 3 हजार 90 मते मिळाली. या फेरीत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना केवळ 41 मते मिळाली.
होमपीच असलेल्या विट्यातच वैभव पाटील यांची पीछेहाट
दुसर्या फेरीत विटा शहराची मतमोजणी झाली. यामध्ये बाबर यांची आघाडी वाढून 11 हजार 65 वर गेली. चौथ्या फेरीअखेर विट्याचे मतदान मोजून झाले होते. या फेरीपर्यंत 15 हजार 323 मतांनी सुहास बाबर आघाडीवर होते. विटा शहरातही जवळपास 4 हजारांपेक्षा जास्त मतांनी सुहास बाबर आघाडीवर होते. होमपीच असलेल्या विट्यातच वैभव पाटील यांची पीछेहाट झाल्याचे दिसले. विट्यात बाबर यांनी चांगली मुसंडी मारत मताधिक्य घेतल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली.
चौथ्या फेरीनंतर प्रत्येक फेरीत बाबर यांचे मताधिक्य वाढतच गेले होते. विसापूर मंडल, खानापूर तालुका आणि आटपाडी तालुका अशा तीनही ठिकाणी निर्णायक आघाडी घेत बाबर यांची विजयाकडे आगकूच राहिली. सातव्या फेरीअखेर शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांची आघाडी तब्बल 30 हजार 284 मतांवर पोहोचली. अखेरीस त्यांनी झालेल्या अडीच लाख मतांपैकी 1 लाख 53 हजार 177 मते मिळवली, तर विरोधी वैभव पाटील यांना 75 हजार 60 मते मिळाली. विशेष म्हणजे अपक्ष निवडणूक लढणारे आणि आटपाडी तालुक्याच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन निवडणुकीत उतरलेले माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना अनामत रक्कमही वाचविता आली नाही. त्यांना केवळ 13 हजार 947 मते मिळाली, तर 759 मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली.