सोन्याच्या दरात अवघ्या आठवडाभरात 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याला ऐन लग्नसराईत झळाळी मिळाली आहे. सराफा बाजारात गेल्या शनिवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 73,739 रुपये होता, परंतु आता तो 77,787 रुपयांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ सोन्याच्या किमतीत 4048 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या शनिवारी चांदीचा भाव 87,103 रुपये होता, आता तो 90 हजार 850 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला. म्हणजेच चांदीच्या किमतीतसुद्धा 3747 रुपयांची वाढ झाली आहे.
अभियंत्यांच्या 169 पदांसाठी एसबीआयमध्ये भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये अभियंत्यांच्या 169 पदांसाठी भरती केली जात आहे. या पदांमध्ये असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) 43 पदे, सहाय्यक व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) 25 पदे, असिस्टंट मॅनेजर (फायर) 101 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी उमेदवार बीई किंवा बीटेक पदवी उत्तीर्ण असावा. तर उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्षे असायला हवे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ibpsonline.ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या ठिकाणी पात्रतांसाठी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
बिन्नी बन्सल फोन पे संचालक मंडळातून बाहेर
सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनी शुक्रवारी ई-कॉमर्स दिग्गज फ्लिपकार्टच्या पेमेंट कंपनी फोन पेच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. पायउतार झाल्यानंतर दहा महिन्यांनी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. 2016 पासून ते फोन पे बोर्डावर होते. कट्टर समर्थकांपैकी एक असल्याबद्दल मी बिन्नी बन्सल यांचे मनापासून आभार मानतो, असे फोन पेचे संस्थापक आणि सीईओ समीर निगम म्हणाले. बिन्नी बन्सल यांनी हितसंबंधांच्या संघर्षाचा हवाला देत आपला नवीन उपक्रम ओप्पडोर लाँच केल्यानंतर या वर्षी जानेवारीमध्ये फ्लिपकार्ट सोडले होते.
आधार अपडेटसाठी 14 डिसेंबरची डेडलाइन
आधार कार्डमध्ये काही अपडेट करायचे असेल तर 14 डिसेंबर 2024 पर्यंत डेडलाइन वाढवण्यात आली आहे. यूआयडीएआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करून यासंबंधी माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिले की, आधार अपडेटच्या सुविधेसाठी फ्री ऑनलाइन डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची सुविधा 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सेवा निःशुल्क असून माय आधार पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे. आधार अपडेटमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर दुरुस्त करता येऊ शकतो.