एकाच दगडात दोन पक्षी, विखे यांनी काढला लोकसभेचा वचपा:थोरातांची यंत्रणा शिर्डीत व्यस्त ठेवण्याची खेळी यशस्वी
2 hours ago
1
लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या खासदार नीलेश लंके यांना संगमनेरकडून मोठी ताकद मिळाली होती. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी, विखे पिता-पुत्रांनी काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावून थोरातांना पराभूत केले. तर दुसरीकडे राणी लंकेंना पराभूत करत खा. नीलेश लंके यांनाही धक्का दिला. जिल्हाभरातच महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून, विखेंनी एका दगडात दोन पक्षी मारून, पराभवाचा वचपा काढला आहे. थोरात व विखे या दोन्ही घराण्यात, धगधगत असलेला टोकाचा राजकीय संघर्ष जिल्ह्याने पाहिला आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखेंचा पराभव करण्यासाठी, संगमनेरमधून सूत्रे फिरवण्यात आली. त्यामुळे विखे विरूद्ध थोरात या संघर्षाला अधिक धार आली. विधानसभा निवडणुकीत डॉ. विखेंनी थेट संगमनेरमध्ये जाऊन थोरातांना आव्हान दिले. तर विखेंचा डाव उलटवून टाकण्यासाठी थोरातांनी शिर्डीत लक्ष घालून प्रभावती घोगरेंना बळ दिले. तेथे प्रियंका गांधींसह स्टार प्रचारकांच्या सभा घडवून आणल्या. परंतु, थोरातांना शिर्डीत गुंतवून संगमनेरात शिवसेनेच्या अमोल खताळांना ताकद देण्याची यशस्वी खेळी विखेंनी केली. तसेच विखेंच्या व्यासपीठावरून देशमुखांची जीभ घसरल्यानंतर झालेल्या जाळपोळीची घटनाही विखेंच्या जिव्हारी लागली होती. पारनेरमध्ये अटीतटीच्या लढतीत विखेंनी शेवटच्या टप्प्यात सूत्रे फिरवून राणी लंकेंना पराभूत केले. खा. लंके यांनी विधानसभेला १२ चे १२ विधानसभेत आणून घालतो, असा शब्द शरद पवारांना दिला होता. पण, विखेंनी त्यांचे मनसुबे उधळून लावत, महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. तर कर्जतमध्ये रोहित पवारांना प्रत्येक मतासाठी झुंजावे लागल्याचे पहायला मिळाले. लोकसभेत कसे चुकले गणित लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखेंना शेवगाव (मताधिक्य ७८४१), राहुरी (११९३६), नगर शहर (३३५८६) मतदारसंघातून आघाडी मिळाली होती. तर पारनेर (३८१००), श्रीगोंदे (३२७११), कर्जत (९१२८ मताधिक्य) मिळवत लंकेंना आघाडी होती. या लोकसभेच्या गणितात, नवी सूत्रे जुळवून विधानसभेत डाव टाकला. जिल्हाभरात डॉ. विखेंनी १० जागांवर मविआला धक्का दिला. विखेंनी कुठे, कुठे लावली ताकद राहुरी विधानसभेत तनपुरेंबरोबरच विखेंचीही ताकद आहे, ही ताकद मताधिक्यातून विखेंनी दाखवून दिली. परंतु, तनपुरेंना येथे पराभवाचा सामना करावा लागला. पारनेरात काशिनाथ दातेंना बळ दिले. अपक्षाच्या माध्यमातून मतविभाजनाचा अचूक डाव साधत, लंकेंना धक्का दिला. तसेच संगमनेरात झालेला संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने पाहिला. थोरातांच्या पराभवाची प्रमुख कारणे निष्ठावानांना दूर ठेऊन, बिल्डर लॉबीला जवळ केल्याचा समर्थकातून दबक्या आवाजात सूर थोरातांच्या बालेकिल्ल्यात अडीच वर्षांत विखेंनी रसद पुरवून महायुतीच्या कार्यकर्त्यांना पाठबळ दिले.विकास कामांना निधी देऊन कार्यकर्त्यांची मोट बांधली. थोरातांसह त्यांची यंत्रणा शिर्डीत गुंतवून ठेवण्यात विखेंची खेळी यशस्वी ठरली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)