येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ २६०५८ मतांनी विजयी झाले (छाया : अविनाश पाटील)
Published on
:
24 Nov 2024, 7:52 am
Updated on
:
24 Nov 2024, 7:52 am
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ २६०५८ मतांनी विजयी झाले आहेत. भुजबळ यांनी सलग पाचव्यांदा या मतदारसंघातून विजय मिळविला. छगन भुजबळ यांना एक लाख ३१ हजार ९४५ तर विरोधी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार ॲड. माणिकराव शिंदे यांना एक लाख ०५ हजार ८८७ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत भुजबळ यांच्या मताधिक्क्यात कमालीची घट झाली आहे.
मिळालेली मते
छगन भुजबळ १३५०२३
माणिकराव शिंदे १०८६२३
मताधिक्य २६४००
राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटल्यानंतर मंत्री भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंत केले होते. त्यामुळे स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच मराठा आरक्षणावरूनही मराठा नेते मनोज जरांगे व भुजबळ यांच्यात नेहमीच आराेप प्रत्यारोप होत असल्याने मराठा समाजाची भुजबळांवर नाराजी असल्याचे चित्र होते. त्यामुळे भुजबळ यांना ही निवडणूक सोपी नसल्याचे बोलले जात होते. मात्र, मतदारांनी भुजबळ यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे. मात्र, यंदा भुजबळ यांना प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. माणिकराव शिंदे यांनी जोरदार टक्कर दिल्याने भुजबळांच्या मताधिक्क्यात मोठी घट झाली आहे.
घटलेल्या मताधिक्यावर भुजबळ नाराज....
मला नेहमी 55 ते 56 हजारांचे मताधिक्य मिळत आले, परंतु ते आता घटले ते आता 27, 28 हजारांवर आले. त्याचे कारणही तसेच आहे आमचे मित्र (मनोज जरांगे) ते जातीवदाचा प्रचार करीत बाकी महाराष्ट्रात कोठे गेले नाही, फक्त येवल्यामध्ये रात्री दोन दोन वाजेपर्यंत होते. परंतु या महाराष्ट्राने आता सिद्ध केले आहे की, महाराष्ट्रात जातिवादाला थारा नाही, काही लोक त्यांना भुलून आमच्याकडून कमी झाले, परंतु लोकांनी आमची इभ्रत राखली.
महाराष्ट्रमध्ये जातीयवादाला थारा नाही, हे निकालातून सिद्ध झाले आहे. संपूर्ण निवडणूक आमच्या लाडक्या बहिंणीेनी जिंकली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आमदार, छगन भुजबळ
येवल्याच्या जनतेने दिलेला कौल मान्य असून आमच्या मुद्दांना प्रतिसाद दिला आहे. येवल्याच्या विकासाला अधिकाधिक योगदान देण्याचे आपले कार्य यापुढेही सुरूच राहणार आहे. जनतेशी आपला संपर्क यापुढेही कायम राहणार आहे.
माणिकराव शिंदे