कळवण : दुर्गादास (बापू) देवरे
कळवण-सुरगाणा मतदारसंघात अतितटीच्या लढतीत राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार पक्षाचे नितीन पवार यांनी माकपाचे जे. पी. गावित यांचा ८ हजार ४३२ मतांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. गावितांनी सतराव्या फेरीपर्यंत कायम राखलेली आघाडी पवारांनी मोडीत काढत विजयाला गवसणी घातली. विजयानंतर पवार समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
मतमोजणी केंद्राबाहेर राष्ट्रवादी-माकप समर्थकांची गर्दी
शेवटच्या क्षणापर्यंत जे. पी. गावित मतमोजणी केंद्रात उपस्थित
विजयानंतर नितीन पवार समर्थकांचा एकच जल्लोष
उमेदवारांना मिळालेली मते
नितीन पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) : १,१९,१९१
जे. पी. गावित (माकप) : १,१०,७५९
रमेश थोरात (स्वराज पक्ष) : २२३०
नितीन पवार (अपक्ष) : १६३९
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला कौल देणाऱ्या कळवण-सुरगाणावासीयांनी यंदाच्या निवडणूकीत महायुतीला खंबीर साथ दिली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत नितीन पवार यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. कळवण-सुरगाणा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी (दि. २३) कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयात पार पडली. सकाळी ८ पासून प्रारंभ झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून जे. पी. गावित यांनी आघाडी घेतली. मतमोजणीच्या सतराव्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राखल्याने माकपासह महाविकास आघाडीच्या गोटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पण अठराव्या फेरीपासून पवारांनी गावित यांची आघाडी मोडीत काढायला सुरवात केली. पवारांनी ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.
विधानसभेच्या लढाईत नितीन पवार हे पाच वर्षात मतदारसंघामध्ये केलेली विकासाची कामे घेऊन जनतेसमोर गेले. त्यांच्या या विकासाला कळवणवासीयांसोबत सुरगाण्याच्या जनतेने साथ दिल्याने माकपला पराभवाची चव चाखावी लागली. नितीन पवारांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शेतकरी संघटनेचे नेते देविदास पवार,अशोक पवार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, युवा नेते ऋषिकेश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, सुरगाणा तालुकाध्यक्ष राजू पवार, मजूर फेडरेशनचे चेअरमन रोहित पगार, मोहन जाधव, जयेश पगार, अतुल पगार, रमेश पवार, रणधीर वाघ आदी उपस्थित होते.
निवडणूकीत विरोधकांनी विकासावर बोलणे अपेक्षित असताना टोकाचे वैयक्तिक आरोप व टीका केली. पण मतदारसंघातील जनतेने विकासकामांना पसंती देत मतदानातून विरोधकांना चोख उत्तर दिले. कळवण-सुरगाणा तालुक्यातील जनतेने विकासाला दिलेला हा कौल असून मी जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील.
नितीन पवार, आमदार, कळवण-सुरगाणा