काँग्रेस नेते थोरातांना ‘जोर का झटका’,शिवसेनेचे खताळ ठरले जायंट किलर:संगमनेर विधानसभा मतदारसंघात 40 वर्षांनंतर सत्तापरिवर्तन

2 hours ago 1
संगमनेर विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला. महायुतीचे उमेदवार अमोल धोंडीबा खताळ यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आ. बाळासाहेब थोरात यांचा तब्बल १० हजार ५६० मतांनी धक्कादायकरित्या पराभव केला. संगमनेर विधानसभा मतदारसंघात ४० वर्षांनंतर सत्तापरिवर्तन झाले. नवखे उमेदवार अमोल खताळ हे ‘जायंट किलर’ ठरले. शहरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. सर्वप्रथम पोस्टल मतमोजणी झाली. खताळ यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. एकूण २१ पैकी दोन फेऱ्यांचा अपवाद वगळता सर्व फेऱ्यांमध्ये अमोल खताळ यांनी थोरात यांच्यापेक्षा अधिक मते मिळवली. संगमनेरमध्ये एकूण २ लाख १५ हजार ६४७ मतदान झाले होते. पैकी अमोल खताळ यांना १ लाख १२ हजार ३८६ मते, तर थोरातांना १ लाख १ हजार ८२६ मते मिळाली. अटीतटीच्या लढतीत खताळ यांनी थोरातांचा १० हजार ५६० मतांनी धक्कादायक पराभव केला. संगमनेर मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पैकी वंचितचे उमेदवार अजिज ओहोरा-२०६९, मनसेचे योगेश सूर्यवंशी यांना १२८५, अपक्ष उमेदवार दत्तात्रय ढगे यांना ५४७, रिपब्लिकनचे शशिकांत दारोळे २२६, समता पार्टीचे भारत संभाजी भोसले १७४, बहुजन समाज पार्टीचे सूर्यभान गोरे १५४, अपक्ष अजय भडांगे १५३, लोकशाही पार्टीचे प्रदीप घुले ९१, जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टीचे अविनाश भोर ७३, भारतीय नवजवान सेना पक्षाचे कलीराम पोपळघट ६६, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे भागवत गायकवाड ६१ मते, तर १४७० नोटाला मतदान मिळाले. खताळ यांना मताधिक्य मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी केली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अंतिम निकाल जाहीर झाला. निकालाआधीच लावलेले थोरातांच्या विजयाचे फ्लेक्स काढले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अमोल खताळ यांना विजयी घोषित करताच क्रीडा संकुलाबाहेर फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. शहरातून खताळ यांची मिरवणूक काढण्यात आली. धांदरफळ घटनेत निमोणचे सरपंच संदीप देशमुख यांची जळालेली गाडी विजयी मिरवणुकीत आणली होती. मतमोजणीच्या आदल्या दिवशी लावलेले माजी आ. थोरात यांच्या विजयाचे प्लेक्स मतमोजणी चालू असतानाच कार्यकर्त्यांनी काढून घेतले. अमोल खताळ यांच्या विजयी मिरवणुकीत माजी खा. सुजय विखे हेदेखील सहभागी झाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article