Published on
:
24 Nov 2024, 7:08 am
Updated on
:
24 Nov 2024, 7:08 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेबरोबरच 13 राज्यांतील 48 विधानसभा जागांवरही पोटनिवडणूक झाली. यात भारतीय जनता पक्षाने 20 जागा बाजी मारली असून काँग्रेसला केवळ सात जागा जिंकण्यात यश आले आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या. पंजाबमध्ये विधानसभेच्या चार जागांवर पोटनिवडणूक झाली. आम आदमी पक्षाने यापैकी तीन जिंकल्या. तर प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला. एनडीए (NDA)ला एकूण 25 जागांवर यश मिळाले आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या खात्यात 16 जागा आल्या. 48 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीची स्थिती जाणून घेऊया...
उत्तर प्रदेश पोटनिवडणूक :
उत्तर प्रदेशमध्ये एकूण 9 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक झाली. यापैकी सहा जागा भाजपने जिंकल्या. समाजवादी पक्षाने दोन तर भाजपचा मित्रपक्ष आरएलडीने एक जागा काबीज केली.
पश्चिम बंगाल पोटनिवडणूक :
पश्चिम बंगालच्या सहा विधानसभा जागांवरील पोटनिवडणूक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व राहिले. या सर्व जागा टीएमसीने जिंकल्या. सीताईमधून संगीता रॉय, मदारीहाटमधून जयप्रकाश टोप्पो, नैहातीमधून सनत डे, हरोआमधून शेख रबिउल इस्लाम, मेदिनीपूरमधून सुजॉय हाजरा आणि तलनादगरामधून फाल्गुनी सिंगबाबू हे उमेदवार विजयी झाले.
पंजाबच्या एकूण चार विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. आम आदमी पक्षाने (आप) तीन जागा जिंकल्या असून काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. काँग्रेसने बर्नाला विधानसभेची जागा आपकडून हिसकावून घेतली आहे. येथून पक्षाचे उमेदवार कुलदीप सिंह ढिल्लन विजयी झाले आहेत.
राजस्थान विधानसभेच्या सात जागांवरील पोटनिवडणुकीत भाजपने पाच जागांवर बाजी मारली. दौसा या एका जागेवर काँग्रेसचा उमेदवरा निवडून आला. तर चौरसी विधानसभा मतदारसंघातून भारत आदिवासी पक्षाचे अनिल कुमार कटारा विजयी झाले.
आसामच्या पाच विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला तीन जागांवर यश मिळाले. युनायटेड पीपल्स पार्टी (लिबरल) चे निर्मल कुमार ब्रह्म यांनी सिडली जागेवर विजय मिळवला. बोंगईगावमधून आसाम गण परिषदेच्या दीप्तीमाई चौधरी विजयी झाल्या.
बिहार विधानसभेच्या चार जागांवर पोटनिवडणूक झाली. एनडीएने चारही जागा जिंकल्या. भाजपने दोन जागा जिंकल्या तर हम आणि जेडीयूने प्रत्येकी एक जागा जिंकली.
कर्नाटकातील पोटनिवडणुकीच्या तीनही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत. शिवगावमधून यासीर पठाण, सांडूरमधून ई. अन्नपूर्णा आणि चन्नापटणामधून सीपी योगेश्वर विजयी झाले आहेत.
‘या’ राज्यांची निवडणूक स्थिती जाणून घ्या
मध्य प्रदेशातील दोन विधानसभा जागांपैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. विजयपूरमधून काँग्रेसचे मुकेश मल्होत्रा तर बुधनीमधून भाजपचे रमाकांत भार्गव विजयी झाले. गुजरातमधील वाव विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसकडून ही जागा हिसकावून घेतली. येथे भाजपचे स्वरूप ठाकोर विजयी झाले.
छत्तीसगडमधील रायपूर नगर दक्षिण मतदारसंघावर भाजपचे उमेदवार सुनील कुमार सोनी यांनीही विजयाचा झेंडा फडकावला. केरळमधील दोन जागांपैकी काँग्रेसने आणि माकपने एक-एक जागा जिंकली. मेघालयातील एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत नॅशनल पीपल्स पार्टीने घवघवीत यश संपादन केले. सिक्कीममधील दोन्ही जागा सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने जिंकल्या.