मविआला भोपळा, भाजपला-३ तर राकाँला १ जागा
गोंदिया (Gondia Election Results) : जिल्ह्यातील ४ मतदार संघाच्या निवडणूक निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आज (ता.२३) सकाळपासून मतमोजणीला सुरूवात होताच महायुतीच्या उमेदवारांनी चारही मतदार संघात पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतली होती. घेतलेली आघाडी कोणत्याही फेरी कमी झालेली नाही. अंतिम निकाल लागण्यापूर्वीच महाविकास आघाडीचा सुपडासाफ होत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले होते. जिल्ह्यातील चारही जागांपैकी एकाही जागेवर मविआच्या उमेदवाराला विजय प्राप्त करता आले नाही. जिल्ह्यातील तीन मतदान संघात भाजपचा कळळ फुलला तर एका मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाच्या घड्याळीची टिकटिक कायम राहिली. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्याचे निकालाने राजकीय विश्लेषकांसह मतदारांना हैराण करून सोडले.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चार विधानसभा मतदार संघात अत्यंत चुरशीच्या निवडणूका पार पडल्या. मतदान प्रक्रियेनंतर एक्झीट पोल काढून मतदारांसह उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे निकालाकडे लक्ष लागले होते. आज, २३ नोव्हेंबर सकाळी ८ वाजता पासून चारही मतदार संघात मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीत पोस्टल मते मोजण्यात आली. तर दुसर्या फेरीपासून ईव्हीएम मतांची मोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासूनच महायुतीच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर आघाडी घेणे सुरू केले. दुपारी १ वाजेनंतर निकालाचे चित्रही स्पष्ट होऊ लागले होते. महायुतीच्या उमेदवारांच्या वाढते मताधिक्य लक्षात कोण किती मताने विजयी होणार? याकडे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील चारही मतदार संघाच्या निकालादरम्यान महायुतीचे उमेदवार विजय होणार, यात कसलेही शंका-कुशंका दिसून आली नाही.
अखेर सायंकाळपर्यंत चारही मतदार संघाचे अंतिम निकाल जाहिर झाले. महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला तर महायुतीचे उमेदवार चारही ठिकाणी विजयी झाले.
तिरोडा मतदार संघातून महायुतीचे विजय रहांगडाले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रविकांत बोपचे यांचा दारूण पराभव केला. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप बन्सोड, आमगाव मतदार संघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार संजय पुराम यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राजकुमार पुराम यांचा धुव्वा उडविला. तर गोंदिया मतदार संघातून महायुती भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांनी काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांचा दारूण पराभव करीत विजय मिळविला. एंकदरीत गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. तर महायुतीच्या भाजपला ३ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) ला १ जागेवर वर्चस्व कायम ठेवता आले.
गोंदियात इतिहास घडला, कमळ फुलला
सन १९६२ पासून विधानसभा सार्वत्रिक निवडणूका पार पडत आहेत. मात्र गोंदिया विधानसभा मतदार संघात एकदाही भाजपला यश संपादन करता आले नव्हते. युती धर्मातून दोनदा शिवसेना पक्षाने विजय मिळविला होता. यामुळे सन २०२४ च्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र यंदाच्या निवडणूक निकालाने सर्व इतिहासातील आकडे मोडून नवा इतिहास रचला आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रात पहिल्यादाच भाजपला कमळ फुलविण्यात यश आले. विशेष म्हणजे, नवनिर्वाचित आमदार विनोद अग्रवाल यांना या विधानसभा क्षेत्रात सलग दुसर्यांदा नवा विक्रम नोंदविण्यात यश आले आहे.
सन १९६२ पासून सार्वत्रिक विधानसभा निवडणूका होत आहेत. तेव्हापासून गोंदिया मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. दरम्यानच्या काळात युती धर्मातून शिवसेनेने दोनदा विजय प्राप्त केले होते. तर सन २०१९ ची निवडणूकही महत्वाची ठरली होती. असे असतानाही भाजपला कमळ फुलविता आले नव्हते. परंतु, २०१९ मध्ये विनोद अग्रवाल यांनी नवा अध्याय लिहला होता. मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यादांच अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. आता सन २०२४ निवडणुकीच्या माध्यमातून विनोद अग्रवाल यांनी आणखी एक नवा विक्रम नोंदविला आहे. भाजपने पहिल्यादांच या मतदार संघात कमळ फुलविला आहे. त्यामुळे गोंदिया मतदार संघात नवा इतिहास नोंदविण्यात विनोद अग्रवाल व भाजप या दोन्ही बाबी यशस्वी झाले आहेत.
तिरोड्यात ‘विजय’ची पहिली हॅट्रीक
तिरोडा मतदार संघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या मतदार संघात भाजपने विजय रहांगडाले यांना तिसर्यांदा रिंगणात उतरविले होते. तिरोडा मतदार संघात अनेकदा विद्यमान आमदारांनी हॅट्रीकसाठी निवडणूक लढविली. मात्र आजपर्यत कोणत्याही उमेदवाराला विजयाची हॅट्रीक करता आली नाही. मात्र सन २०२४ ची निवडणूक भाजप आणि विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांच्यासाठी नव्या इतिहास घडविण्याची ठरली. तिरोडा विधानसभा मतदार संघात पहिली विजयाची हॅट्रीक नोंदविण्यात विजय रहांगडाले यांना यश आले आहे.
काँग्रेसचे गर्व हरण
गोंदिया : गोंदिया जिल्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान्ा तिकीट वाटपात महाविकास आघाडी धर्मातून तीन जागा आपल्या पारड्यात पाडून घेतल्या. परंतु, तिकीट वाटप करताना मतदार, कार्यकर्ते व सर्व समीकरणाकडे दुर्लक्ष करीत आम्ही दिलेले उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, अशा गर्व दाखविण्यात आला. अर्जुनी मोरगावात दिलीप बन्सोड यांच्या उमेदवाराची विरोध दर्शविण्यात आला तर आमगाव येथील विद्यमान आमदार सहषराम कोरोटे यांना डावलून नव्या चेहर्याला संधी देण्यात आली. यामुळे काँग्रेस तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अतिआत्मविश्वासपणा तारक ठरणार की मारक? अशी कुणकुण सुरू झाली होती. त्यातच निवडणूक निकालाने काँग्रेसच्या ‘गर्वाचे घर खाली’ असे सिध्द करून दिले.
एंकदरीत काँग्रेसला चारपैकी एकही जागा सर करता आली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गर्वाचे हरण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्यात सन २०१९ मध्ये एक जागा काँग्रेसला प्राप्त झाली होती. ती जागा देखील वाचविता आली नाही. त्याचबरोबर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल २२ हजार मतांची आघाडी मिळाली होती. परंतु, ही आघाडी देखील कायम ठेवून आपल्या पारड्यात खेचता आली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जरी पराभूत झाले असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा अति आत्मविश्वासपणा काँग्रेससाठी आत्मघातकी ठरल्याची चर्चा आहे.
भंडारा-गोंदिया खा. प्रफुल पटेलांचे वर्चस्व कायम
गोंदिया : जिल्ह्यातील चारही मतदार संघात खा.प्रफुल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याची चर्चा होती. त्यामुळे महायुती उमेदवारांच्या मागे खा.प्रफुल पटेल हे सर्वशक्तीपणे खंबीरपणे उभे राहिले. जिल्ह्यातील चारही मतदार संघात प्रचाराच्या रणधुमाळीत खा.पटेलांनी स्वत:ला झोकून दिले होते. तब्बल १५ दिवस खा.प्रफुल पटेल गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ठाण मांडून होते. त्यामुळे निवडणूक निकालाकडे लक्ष लागले होते. गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्याने खा.प्रफुल पटेलच वजनदार नेते आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.