Eknath Shinde,Chief Minister of MaharashtraPudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 5:47 am
Updated on
:
24 Nov 2024, 5:47 am
ठाणे : गेल्या अडीच वर्षांपासून राज्याच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी - पाचपाखाडी विधानसभा मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची होती. या प्रतिष्ठेच्या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार केदार दिघे यांचा 1 लाख 20 हजार 717 मतांनी पराभव करत विजयाचा चौकार मारला.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहराच्या हद्दीत कोपरी - पाचपाखाडी विधासभा मतदार संघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात होते. राज्यात अडीच वर्षांपूर्वी झालेल्या बंडाचे सत्ता केंद्र असलेल्या कोपरी -पाचपाखाडी मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या तत्वानुसार राजकारण आणि समाजकारण करत असल्याचे सांगतात, त्याच आनंद दिघे यांचे पुतणे शिवसेना (उबाठा) गटाचे केदार दिघे आणि काँंग्रेसचे बंडखोर मनोज शिंदे त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होते.
राज्याच्या बदलेल्या सत्ता समीकरणानंतर होत असलेली ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची आहे. विधानसभेच्या गेल्या 3 निवडणूकांचा विचार करता यंदा या मतदारसंघात 12 टक्के मतदान जास्त झाल्याने दोन्ही तुल्यबळ उमेदवारांचे टेन्शन वाढले होते, मतदानाचा हा वाढलेला टक्का कुणाच्या पारड्यात विजयाचे दान टाकतो, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते. कोपरी-पाचपाखाडी हा मतदार संघ पूर्वी ठाणे शहर मतदार संघांत होता.2008 मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कोपरी-पाचपाखाडी हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. तेव्हापासून एकनाथ शिंदें यांनी याच मतदारसंघाचे नेतृत्त्व केले.शिवसेना आणि आनंद दिघेंना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे,अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची वेगळी चूल मांडल्याने मतदारांच्या झालेल्या विभाजनामुळे नेमका कौल कुणाला मिळतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष होते.
पेचात मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक लढवली
एकीकडे आनंद दिघे यांचे शिष्य तर दुसरीकडे आनंद दिघे यांचे कुटुंबीय अशा पेचात मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक लढवली आहे. गरीब व मध्यमवर्गीय महिलांना आधार ठरलेली लाडकी बहीण आणि ठाणेकरांना मिळालेली टोलमाफीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाची दारे खुली केली.साहेबच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे बॅनर वागळे इस्टेट विभागात शुक्रवारी रात्रीपासूनच झळकत होते. एकीकडे आनंद दिघे यांचे शिष्य तर दुसरीकडे आनंद दिघे यांचे कुटुंबीय अशा पेचात मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक लढवली आहे. दिघेचे पुतणे म्हणून आणि ठाकरे गटातील सहानुभूतीची लाट यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल, असे वाटत होते, परंतू मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून एकनाथ शिंदे यांनी घेतलेले 5 ते 7 हजारांचे घेतलेले मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम होते. केदार दिघे यांची पहिल्या फेरीपासूनची मते हजार ते दीड हजारांच्या घरात होती. त्यामुळे पहिल्या 10 फेर्यातच शिंदेच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याने कार्यकर्त्यांनी आयटीआय या मतमोजणी केंद्राच्या बाहेर विजयी जल्लोष करण्यास सुरवात केला.