Published on
:
24 Nov 2024, 8:38 am
Updated on
:
24 Nov 2024, 8:38 am
Pune News: वडगाव आनंद (ता. जुन्नर) शिवारातील गाढवेलोळी मळा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. २४) पहाटेच्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. जेरबंद बिबट्यास माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, वडगाव आनंदच्या पिंपळगाव कालव्याच्या लगत असलेल्या गाढवीलोळी मळा येथे शनिवारी (दि. २३) पहाटे सुवर्णा शिंदे यांचे गोठ्यातील एक शेळी बिबट्याने ठार करत काही अंतरावर नेऊन फस्त केली होती. या घटनेचा वनविभागाने पंचनामा करत ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत तातडीने बिबट्याने शेळी फस्त केलेल्या ठिकाणाजवळ पिंजरा लावला. वनविभागाच्या या पिंजऱ्यात रविवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद बिबट मादी असून अंदाजे चार वर्षे वयाची असल्याचे आळे वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक कैलास भालेराव यांनी सांगितले.
आळे वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत असलेल्या आळे, संतवाडी, कोळवाडी, राजुरी, उंचखडक, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार, काळवाडी, पिंपळवंडी, उंब्रज नंबर एक उंब्रज नंबर दोन या गावांमध्ये बिबट्यांचा उपद्रव लक्षात घेऊन त्यांना जेरबंद करण्यासाठी सुमारे २४ वर पिंजरे आजही कार्यरत असल्याची माहित वनपाल अनिल सोनवणे यांनी दिली.