नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या बनलेल्या निवडणुकीत भाजपच्या विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सलग तिसर्यांदा विजय मिळवत हॅट्ट्रिक साधली आहे.Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 8:19 am
Updated on
:
24 Nov 2024, 8:19 am
नाशिक : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या बनलेल्या निवडणुकीत भाजपच्या विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सलग तिसर्यांदा विजय मिळवत हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांचा 17,856 मतांच्या फरकाने पराभव केला. प्रा. फरांदे यांना तब्बल एक लाख 5,689 मते मिळाली असून, गिते यांना 87,833 मतांवर समाधान मानावे लागले आहे. वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत डिपॉझिटही वाचविता आले नाही. वंचितचे मुशीर सय्यद यांना जेमतेम 3080 मते मिळाली.
ठाकरे गटाच्या वसंत गितेंचा 17,856 मतांनी पराभव
बहुजन आघाडीचे डिपॉझिट जप्त
प्रा. फरांदे यांची पहिल्या फेरीपासूनच आघाडी
मिळालेली मते
प्रा. देवयानी फरांदे - 1,05,689
वसंत गिते - 87,833
मुशीर सय्यद - 3,080
नोटा - 1,644
लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघाने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याने विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील महायुतीच्या किंबहुना भाजपच्या कामगिरीविषयी शंका उपस्थित केली जात होती. परंतु एकसंध राहिलेली महायुती आणि भाजपचे सूक्ष्म निवडणूक नियोजन यामुळे फरांदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर बनला. नाशिक मध्य मतदारसंघातून फरांदे, गिते यांच्यासह 10 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सर्वप्रथम टपाली मतांची गणना करण्यात आली. त्यानंतर सकाळी 8.30 च्या सुमारास प्रत्यक्ष मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू झाली.
पहिल्याच फेरीत भाजपच्या फरांदे यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. 22 व्या फेरीअखेर फरांदे यांना नोटाच्या 703 मतांसह एकूण 1,05,689 मते मिळाली. तर गिते यांना नोटाच्या 682 मतांसह एकूण 87,833 मते मिळाल्याने 17,856 मताधिक्याने फरांदे यांना विजयी घोषित करण्यात आले.
नाशिक मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वसंत गिते यांचा विजय होईल, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात होता. परंतु गिते यांचा पराभव झाल्याने समर्थकांचा हिरमोड झाला. गितेंच्या बालेकिल्ल्यात फरांदे यांच्या विजयाच्या घोषणा दुमदुमल्या. पहिल्या फेरीपासून भाजपच्या फरांदे यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवानंतर भाजपच्या देवयानी फरांदे यांनी सावध भूमिका घेत हिंदुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण करण्याची खेळी केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही त्यांच्या मदतीसाठी धावून आली. त्यामुळे फरांदे यांचा विजय सुकर बनला.
मतदारांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला याबद्दल आभार. अपप्रचार करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. जनतेने विरोधकांचे मनसुबे हाणून पाडले.
प्रा. देवयानी फरांदे, विजयी, भाजप
महाराष्ट्रभर अचंबित करणारे निकाल लागले आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात आपण जोमाने लढा दिला. मतदारसंघातील जनतेने मतांमधून आपल्याला भरभरून प्रेम दिले आहे. जनतेचे आभार.
वसंत गिते, पराभूत, शिवसेना ठाकरे गट