राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेल्या मेहनतीमुळे महाराष्ट्रात फुलले कमळ:लोकसभा पराभवानंतर केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे वाढला टक्का

1 hour ago 1
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रहितासाठी १००% मतदानाचे आवाहन घराघरापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त मतदान करवून घेण्याच्या स्वयंसेवकांच्या निर्लेप वृत्तीने केलेल्या कामामुळे महाराष्ट्रात फुलपँट घालून कमळ फुलले. त्यानंतर संपूर्ण राज्यात जल्लोष सुरू असताना स्वयंसेवक मात्र निर्लेप वृत्तीने “पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढके जाना|सबको लेकर साथ मे आगे है बढते जाना’ म्हणत शांतपणे मार्गस्थ झाला आहे. या विधानसभेत भाजप राउंडवर आणि स्वयंसेवक ग्राउंडवर अशी स्थिती होती. संघाने स्वयंसेवकांचा कोअर ग्रुप तयार केला होता. महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक गट, महिला अशी विभागणी करून स्वयंसेवकांनी संपर्क आणि संवाद वाढवला. त्यातून लोकांना हिंदुत्वासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. भाजपची बूथ यंत्रणा स्वयंसेवकांनी ताब्यात घेतल्यासारखीच होती. कोणत्या बूथवरून किती मतदान झाले, मतदानाला कोण निघाले नाही, एखाद्या कुटुंबातील कोण बाकी राहिले यावर स्वयंसेवकांनी कटाक्षाने लक्ष दिले. परिणामी मतदान ६ टक्क्यांनी वाढले. धुळे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून धडा घेत संघाने “बटेंगे तो कटेंगे’ हा नारा घरोघरी पोहोचवत हिंदुत्वासाठी मतदान करण्यासाठी प्रेरित केले. विशेषत: मतदान करताना “बटेंगे तो कटेंगे’ आणि “एक हैं तो सेफ हैं’ हे नारे लक्षात ठेवून मतदान करण्याचे आवाहन केले. लँड जिहाद, लव्ह जिहाद, धर्मांतरण, दगडफेक, दंगेधोपे यावर जागरण करण्यात आले. एकीकडे हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरताना दुसरीकडे दलित आणि सेवा वस्त्यांमधून संविधान, आरक्षण, अनुसूचित जाती याबद्दल महाविकास आघाडीकडून पसरवण्यात आलेले गैरसमज दूर केले. केरळमधील पल्लकड येथे ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान झालेल्या संघाच्या समन्वय बैठकीत भाजप आणि संघातील दरी बरीच कमी झाली. तरीही नाराजी कायम होती. परिणामी संघ लोकसभेत निष्क्रिय राहिल्याने भाजपला प्रचंड फटका बसला. त्यानंतर भाजप संघाला शरण गेल्यानंतर विधानसभेत संघ सक्रिय झाला. भाजपचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मार्गदर्शक मानतात. तसेच आपण स्वयंसेवक आहोत हे उघडपणे सांगण्यात संकोच बाळगत नाहीत. दुसरीकडे संघ सातत्याने भाजपला मदत करीत असला तरी भाजप अडचणीत येईल, असे कधीच बोलत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांचा सन्मान राखत परस्पर सामंजस्याने काम झाले. तीन महिन्यांपासून सुरू होत्या संघाच्या बैठका जातीय विभाजनाच्या विरोधकांच्या कथानकाशी संबंधित मुद्दे, दलित आणि मागास समुदायांमध्ये घटना बदलाबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यात संघाला यश आले. तीन महिन्यांपासून रा. स्व. संघाच्या समन्वय बैठका सर्वत्र सुरू होत्या. यापूर्वीच्या निवडणुकांतून संघाने समन्वय बैठकांतून कधीही भाजपचे नाव घेतले नव्हते. तशी परंपराही नव्हती. हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष, हिंदुत्वाची बैठक असलेला पक्ष असे नाव न घेता उल्लेख व्हायचे, पण आता संघाकडून थेट भाजपला निवडून आणण्याचा संदेश स्पष्टपणे देण्यात आला. “हिंदुत्वासाठी एकत्र या, संघटित व्हा’ असे आवाहन स्पष्टपणे करण्यात आले. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी प्रभात शाखांकडून कोजागरी उत्सवातूनही जनजागरण करण्यात आले. संघ विचारांनी प्रेरित साेशल मीडिया ग्रुपवरूनही हिंदुत्वाचा जोरकस प्रचार करण्यात आला. त्याचे अनुकरण हिंदू मतदारांनी केले व भाजपच्या पदरात भरघोस विजयाचे दान टाकले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article