Published on
:
24 Nov 2024, 4:21 am
Updated on
:
24 Nov 2024, 4:21 am
नाशिक : राज्यात महायुतीची त्सुनामी आली असताना नाशिक जिल्ह्यातही त्याचा परिणाम कायम राहिला आहे. जिल्ह्यात पंधरापैकी चौदा जागांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व स्थापन करताना महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. महायुतीच्या या विजयात पालकमंत्री दादा भुसे आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री यांचे यश अधिक उळूजन निघाले आहे. या दोघांनी सलग पाचव्यांदा विजय संपादन करत विधानसभा गाठली आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा महायुतीने चौदा जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी अजित पवार गटाने ७ ठिकाणी विजय संपादन केला असून भाजपच्या पारड्यात पाच तर शिंदे सेनेने दोन्ही जागा राखण्यात यश मिळवले आहे. मात्र, महायुतीच्या विजयाचे एक कंगोरो लक्षात घेतला असता चौदाव्या विधानसभेतील जिल्ह्यातील आमदारांवरच पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. यंदाच्या निवडणुकीत अजित पवार गटाने सात जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, सर्वाधिक लक्षवेधी लढत ही येवला आणि दिंडाेरी मतदारसंघाची म्हणावी लागेल. येवल्यात मराठायाेद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सभा घेत भुजबळांच्या विरोधात वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. परंतु, निकालनंतर येवलावासीय भुजबळांच्या पाठिशी ठाम उभे असल्याचे दिसून आले. दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांच्यापुढे शरद पवार गटाने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण, निवडणुकीत सर्व आव्हाने झेलत झिरवाळ यांनी विजयाला गवसणी घातली आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांनी दिंडोरीचा गड सर केला. त्याचवेळी पवार गटाचे सिन्नरचे माणिकराव कोकाटे, निफाडचे दिलीप बनकर, इगतपुरीचे हिरामण खाेसकर व कळवणचे नितीन पवार यांनी सलग दुसरा विजय खेचून आणला.
अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघातून दादा भुसे हे पाचव्यांदा विधानसभेवर निवडून गेले. यंदाच्या निवडणुकीत भुसे यांच्यासमोर त्यांचेच कधीकाळचे सहकारी असलेले बंडुकाका बच्छाव व शिवसेना ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांनी आव्हान उभे केले. पण मालेगावकरांनी दादांवरच पुन्हा एकदा विकासाची जबाबादारी सोपविली आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात गाजलेल्या नांदगाव मतदारसंघात शिंदे सेनेचे सुहास कांदे यांनी अपक्ष माजी उमेदवार खासदार समीर भुजबळ यांचा दारुण पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली.
भाजपने जिल्ह्यात विद्यमान पाच आमदारांनाच पुन्हा एकदा रिंगणात उतरविले होते. भाजपच्या या स्ट्रॅटजीवर राजकीय तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उभे केले. पण, विद्यमान आमदारांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत विजयश्री खेचून आणली. चांदवडचे डाॅ. राहुल आहेर, नाशिक मध्यच्या देवयानी फरांदे तसेच नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे यांनी विजयाची हॅट्ट्रीक साधली. बागलाणमधून जिल्ह्यात सर्वात जास्त १ लाख २९ हजार ३६८ मतांनी निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या दिलीप बोरसे यांनी दुसऱ्यांदा विजय संपादन केला. याव्यतिरिक्त मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएमचे मौलाना मुफ्ती यांनीही गड कायम राखताना दुसऱ्यांदा विजयाच्या लाटेवर स्वार झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील जनतेने लोकप्रतिनिधींना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींवर आता जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाची जबाबदारी असणार आहे.
हिंदुत्व, लाडक्या बहिणींनी तारले
महायुतीच्या प्रचारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांना माेफत वीज, महिला सुरक्षिततात, लाडका भाऊ अशा योजनांचा प्रचार व प्रसार योग्यरीतीने करण्यात आला. तसेच भाजपने दिलेल्या हिंदुत्वाचा नारा तसेच कटेंगे तो बटेंगेलाही मतदारांनी योग्य ती साथ दिल्याचे निकालातून स्पष्ट होते आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात महाविकास आघाडीत तीन्ही पक्षांचे तोंड तीन दिशेला असल्याने त्यांच्या पदरी निराशेचे दान आले आहे.