हे सुरांनो चंद्र व्हा, घेई छंद मकरंद, श्रोत्यांच्या फर्माइशवरून नाट्यगीते:शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी यांनी दिला आठवणींना उजाळा‎

1 hour ago 1
हे सुरांनो चंद्र व्हा, तसेच घेई छंद मकरंद हा मिलिंद...असे श्रोत्यांच्या फर्माइशवरून एकाहून एक सरस गीत सादर करत शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी यांनी श्री अंबादेवी संगीत सोहळ्यात दुसरी मैफल रंगवताना शुक्रवारी रात्री ८ वाजता गत आठवणींना उजाळा दिला. अमरावतीला मी बाबांसोबत गायलो तेव्हा असाच अभेद, माझ्या मुलासारखा तरुण होतो, असे त्यांनी सांगितले. कित गये श्याम...ने रसिकांना खिळवून ठेवले तर अमृताची फळें अमृताची वेली । ते चि पुढे चाली बीजाची ही ॥१॥ ऐसियांचा संग देई नारायणा । वोलाचा वचना जयांचिया ॥ध्रु.॥ या संत तुकारामांच्या अभंगाने त्यांनी सांगता केली. भारतीय संगीत हे विश्वातील प्राचिन आणि समृद्ध संगीत परंपरांपैकी असून स्वर आणि लयीच्या साहाय्याने रागरूपाचा आविष्कार होतो. सुरेल लय, ताल, सूर, आवाज आणि रियाजाची सुखद प्रचिती देत प्रतिभावान गायक व संगीतकार पं. शौनक अभिषेकी यांच्या रंगतदार गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांचे व सहकलाकारांचे स्वागत विश्वस्त रवींद्र कर्वे, सुरेंद्र बुरंगे यांनी कीर्तन सभागृहात केले. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या बैठकीची सुरेल प्रचिती म्हणजे शौनक यांचे तयारीचे गायन. शौनक यांचे वडील पं. जितेंद्र अभिषेकी यांचे गायन म्हणजे सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेषत्वाने मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचे मर्म होते. अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. शौनक यांनी कार्यक्रमाची सुरेल सुरुवात राग सरस्वतीने केली. कल्याण थाटातील रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी गायिला जाणारा हा राग अतिशय गोड राग असून, कर्नाटक संगीताचा प्रभाव असलेला हा राग. या बंदिशीला श्रोत्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटाची दाद घेत त्यांनी अन्य रचना सादर केल्या. कलावती व खमाज रागातील ठुमरी गाताना शौनक यांची आणि श्रोत्यांची गानसमाधी लागली. कित गये श्याम... वाद्यांच्या जुगलबंदीने कार्यक्रमाची गोडी वाढली. नाट्यसंगीत, ठुमरी, दादरा, कजरी, चैती, होली हे संगीत प्रकारही श्रोत्यांना भावतात. शास्त्रीय संगीत आणि राग सामान्य श्रोत्यांना कळत नसतील पण श्रोत्यांना सूरसागरात चिंब भिजवले हे खरे. हार्मोनियम संगत अनंत जोशी यांनी तर तबला साथ स्वप्निल भिसे यांनी दिल्याची माहिती संगीत तज्ज्ञ अनिता कुळकर्णी यांनी दिली. प्रास्ताविक दीपा खांडेकर, सूत्रसंचालन अॅड. राजेंद्र पांडे यांनी केले. कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व स्तरातील रसिक उपस्थित होते. सादरीकरणाची पद्धत भिन्न परंतु आनंददायी : अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी दोघी उच्च विद्याविभूषित भगिनींचे गायन घराणे, गुरु, तालीम एकच पण सादरीकरणाची अभिव्यक्ती भिन्न असली तरी परस्परपूरक आणि आनंददायी आहे. दोघींच्या आवाजाची जातकुळी वेगळी, आवाजाचा पोत वेगळा आहे पण गाणे खुलवण्याचे कसब तेच आहे. पल्लवीचा आवाज तार सप्तकात जाणारा तर अपूर्वाचा भावपूर्ण आहे. दोघी कलाकार बहिणींनी अनेक कार्यक्रमात सादरीकरण करून संगीत विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ख्यालाचे सुसंगत सादरीकरण म्हणजे कल्पनारम्य आलापांचे सौंदर्यात्मक मिश्रण, मधूर आणि तेजस्वी आवाज, रागाची प्रतिमा सौंदर्यासह उलगडणे होय. ताल, गायन शैली आणि राग सादरीकरणाची शुद्धता अपूर्वाच्या गाण्यात दिसतात. हार्मोनियम संगत अनंत जोशी यांनी तर तबला संगत स्वप्निल भिसे यांनी केली. अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी भगिनींचे सहगायन पहिल्या दिवसाच्या सत्रात प्रारंभी मुंबई येथील सूरमणी अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी भगिनींचे रंगतदार सहगायन झाले. त्यांचे पणजोबा पं. अंतुबुवा जोशी हे औंध येथील राजदरबारी संगीतकार होते. अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी म्हणजे संगीत क्षेत्रातील पाचवी पिढी आहे. पूर्वा व पल्लवीने मैफलीचा प्रारंभ राग जैतश्रीने केला. यानंतर त्यांनी रात्रीच्या प्रथम प्रहरी गायला जाणारा श्याम कल्याण राग सादर केला. राग शुद्ध सारंग आणि श्याम कल्याणमध्ये काही साम्य असणारा हा राग. मैफलीच्या शेवटी गायला आनंदी वृत्ती दर्शवणारा तराणा. जय देवी माता शिवानी भवानी, या देवी स्तवनाला रसिकांची दाद घेत कार्यक्रमाचा पूर्वार्ध संपला. अपूर्वा आणि पल्लवी या दोघीही बहिणी ग्वाल्हेर घराण्याच्या उत्कृष्ट कलाकार आहेत. गायक चमूचे स्वागत विद्या देशपांडे, विजया गुढे, डॉ. जयंत पांढरीकर, किशोर बेंद्रे, दीपा खांडेकर यांनी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article