उत्तर प्रदेशात मिळालेल्या पराभवानंतर आता बहुजन समाज पक्षाच्या सुप्रिमो मायावती यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आपला पक्ष आता कोणतीही पोटनिवडणुक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ईव्हिएमच्या माध्यमातून बनावट मतदान केले जात आहे. त्यामुळे आता जोपर्यंत निवडणुक आयोग पोटनिवडणुकीत होणारे बनावट मतदान रोखण्यासाठी कठोर पावले उचलत नाही तोपर्यंत बसपा देशात कोणतीही पोटनिवडणुक लढवणार नाही असा इशाराच मायावती यांनी दिला आहे.
निवडणुकीदरम्यान बनावट मतदान झाल्याचा आरोप मायावती यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. मायावती म्हणाल्या की, देशात आधी बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान केले जात होते. मात्र आता ईव्हिएमच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करुन बनावट मतदान केले जात होते. लोकशाहीसाठी हे चिंताजनक आहे. एवढेच नाही तर देशात लोकसभा आणि राज्यात विधानसभा निवडणुका, विशेषकरुन पोटनिवडणुकीत हे खुलेआम केले जात आहे.
नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत याबाबत आवाज उठवला जात आहे. आपापल्या देशाच्या लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे. अशा परिस्थितीत आमच्या पक्षाने निर्णय घेतला की, आतापर्यंत देशातील बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणुक आयोग कठोर पावले उचलताना दिसत नाही तोपर्यंत आता बसपा देशात पोटनिवडणुका लढणार नाही.
यूपी पोटनिवडणुकीत बसपाचा पराभव झाला. बसपाने सर्व 9 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, मात्र त्यांना कुठेही विजय मिळाला नाही. शिवाय अनेक जागांवर त्यांना सुमारे 1000 मते मिळाली. सर्व नऊ जागांची मते जोडली तर बसपाला एकूण 1 लाख 32 हजार 929 मते मिळाली.