पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी हॅट्ट्रिक साधत, मोठ्या मताधिक्याने आपला गड राखला. Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 8:10 am
Updated on
:
24 Nov 2024, 8:10 am
नाशिक : पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी हॅट्ट्रिक साधत, मोठ्या मताधिक्याने आपला गड राखला. त्यांनी तब्बल 68 हजार 177 मतांनी विजयश्री खेचून आणत शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर आणि मनसेचे दिनकर पाटील यांचा दारुण पराभव केला. तिरंगी लढतीचे चित्र असलेल्या या मतदारसंघात आमदार हिरे यांनी एकतर्फी विजय साकारताच समर्थकांनी एकच जल्लोष केला.
बडगुजर दुसर्या, तर मनसेचे दिनकर पाटील तिसर्या स्थानी
माजी महापौर दशरथ पाटील यांचा धुव्वा
’वंचित’च्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त
मिळालेली मते
सीमा हिरे - 1,41,725
सुधाकर बडगुजर - 73,548
दिनकर पाटील - 46,649
अमोल चंद्रात्रे - 7,862
कामगारवर्गाचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या नाशिक पश्चिममध्ये यंदा तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले होते. मविआकडून ठाकरे सेनेचे सुधाकर बडगुजर मैदानात होते, तर भाजपने तिकीट नाकारल्याने ऐनवेळी मनसेत उडी घेऊन दिनकर पाटील मैदानात उतरले होते. अटीतटीची लढत वर्तविली जात असतानाच हिरे यांनी मोठे मताधिक्य मिळवित एकतर्फी विजय साकारला. हिरे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत राहिली. त्यांनी पहिल्या फेरीत 1,015 मतांची आघाडी घेतली. पहिल्या चार फेर्यांपर्यंत मनसेचे दिनकर पाटील दुसर्या स्थानी असल्याने हिरे आणि पाटील यांच्यात लढतीची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, पाचव्या फेरीपासून बडगुजर दुसर्या स्थानी आले. मात्र, तोपर्यंत आमदार हिरे यांचा लीड 11 हजार 539 मतांवर पोहोचल्याने तो तोडणे अखेरपर्यंत शक्य झाले नाही. 10 व्या फेरीपर्यंत आमदार हिरे यांचा लीड 19 हजार 912 पर्यंत पोहोचला होता, तर 15 व्या फेरीत 31 हजार 626 मतांचा लीड मिळताच आमदार हिरे यांचा विजय निश्चित झाला होता, तर 30 व्या फेरीअखेर आमदार हिरे यांना पोस्टल मतांसह एक लाख 41 हजार 725 मते मिळाली असून, त्यांचा तब्बल 68 हजार 177 मतांनी विजय झाला.
लाडकी बहीण योजना आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर मतदारांनी भरभरून मतदान केले. मागील 10 वर्षांमध्ये मतदारसंघात अनेक कामे केल्याची पावती आहे.
सीमा हिरे, विजयी उमेदवार
प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे पक्षातील पदाधिकार्यांनी पाठ फिरविलेली असतानाही आलेला निकाल धक्कादायक आहे. लागलेला निकाल हा ‘मॅनेज’ निकाल असल्याचे स्पष्ट होते.
सुधाकर बडगुजर, पराभूत उमेदवार, मविआ