मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघातील मतदारांकडून यंदाच्या निवडणुकीत महायुतीतील भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना 2014 नंतर पुन्हा विजयाची संधी दिली.Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 6:48 am
Updated on
:
24 Nov 2024, 6:48 am
145 मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघातील मतदारांकडून यंदाच्या निवडणुकीत महायुतीतील भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना 2014 नंतर पुन्हा विजयाची संधी दिल्याने त्यांचा 60 हजार 433 मताधिक्याने विजय झाला. त्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील भुताळे यांच्याकडून करण्यात आली तर मेहता यांना एकूण 1 लाख 44 हजार 376 मते मिळाली.
यंदाच्या निवडणुकीत मिरा-भाईंदरमधून महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता, महाविकास आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसैन व अपक्ष उमेदवार गिता जैन यांच्यात तिरंगी लढत होण्याचे संकेत मिळत होते. त्याचे वृत्त दैनिक पुढारीने वेळोवेळी प्रसिद्ध करीत येथील लढत प्रत्यक्षात मेहता विरुद्ध मुझफ्फर अशीच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच यंदाच्या निवडणुकीत मागील विजयानुसार मतदार यंदा नवीन उमेदवार मुझफ्फर यांना विजयाची संधी देणार कि मेहता किंवा जैन यांना विजयी करून विजयाच्या संधीची पुनरावृत्ती करणार, असा अंदाज वर्तविला होता. यानुसार मतदारांनी मेहता यांना विजयी करून त्यांना पुनर्संधी दिल्याचे शनिवारी जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवणुकीत एकूण 5 लाख 10 हजार 862 मतदारांपैकी एकूण 2 लाख 64 हजार 354 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. त्याची मतमोजणी शनिवारी भाईंदर पूर्वेकडील स्व. प्रमोद महाजन सभागृहात घेण्यात आली. मतमोजणीला उत्तनमधील एकूण 24 मतदान केंद्रात झालेल्या मतांच्या मोजणीपासून सकाळी 8 वाजता सुरुवात करण्यात आली. या पहिल्या फेरीत एकूण 11 हजार 715 मतांपैकी मेहता यांना 3 हजार 597 इतक्या दुसर्या क्रमांकाची मते मिळाली. तर मतमोजणीतील पहिल्या फेरीतच मविआचे मुझफ्फर हुसैन यांना 6 हजार 770 मते मिळून त्यांना 3 हजार 173 मतांचे लीड मिळाले. मात्र दुसर्या फेरीपासून मुझफ्फर यांच्या मताधिक्याला मेहता यांनी धक्का देत मतांची आघाडी घेतली. तर 13, 14, 15 व 17 व्या फेरीत मुझफ्फर यांना मताधिक्य मिळून त्यांनी मेहतांचे लीड कमी करण्याच्या प्रयन्त केला. यावेळी मात्र महायुतीच्या गडात चिंतेचे वातावरण पसरले असतानाच पुन्हा मेहतांनी लीड मिळवीत मुझफ्फर यांना मागे टाकले. त्यांना एकूण 1 लक्ष 44 हजार 376 मते मिळून एकूण 60 हजार 433 मताधिक्य मिळाले. तर मुझफ्फर यांना दुसर्या क्रमांकाची 83 हजार 943 इतकी मते मिळाली. तसेच तिसर्या क्रमांकाची मते अपक्ष उमेदवार गिता जैन यांना मिळाले.
मतदारांनी भरघोस मतांनी आपल्याला विजयी केल्याने त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी आपल्या विजयासाठी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. लोकांच्या विश्वासाने आपल्याला मते दिली असून त्याच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची ग्वाही देतो. आणि मिरा-भाईंदर शहराला प्रगतीशील करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार.
नरेंद्र मेहता, महायुती
निवडणुकीचे निकाल आश्चर्यचकित करणारे असले तरी या लोकशाही प्रक्रियेला मानून जनादेशाचा आदर करतो. तसेच महायुतीतील सर्व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी मनपासून प्रचार केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि नवनिर्वाचित आमदार, नरेंद्र मेहता यांचे अभिनंदन करतो.
मुझफ्फर हुसैन, महाआघाडी