ओवळा-माजिवडा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांचा तब्बल 1 लाख 8 हजार 158 मताधिक्याने चौथ्यांदा दणदणीत विजय झाला आहेPudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 6:38 am
Updated on
:
24 Nov 2024, 6:38 am
ठाणे : ओवळा-माजिवडा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांचा तब्बल 1 लाख 8 हजार 158 मताधिक्याने चौथ्यांदा दणदणीत विजय झाला आहे. सरनाईक यांनी उबाठा पक्षाचे उमेदवार आणि माजी नगरसेवक नरेश मणेरा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून शिवसेनेचा गड राखला आहे. तर मनसेचे संदीप पाचंगे यांचे या निवडणुकीत डिपॉजिटच जप्त झाले आहे. प्रताप सरनाईक यांना एकूण 1,84,178,नरेश मणेरा यांना 76,020,तर मनसेच्या संदीप पाचंगे यांना 13,552 मते मिळाली आहे. 4,193 मतदारांनी नोटाला पसंती दर्शवली आहे.
ठाण्यातील चार मतदार संघातील प्रमुख लढतीतील प्रमुख लढतीत असलेल्या ओवळा माजिवडा मतदार संघात शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी चौथ्यांदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. घोडबंदर येथील न्यू होरायजन शाळेत ओवळा-माजिवडा मतदार संघाची मतमोजणी झाली.मतमोजणीसाठी 24 फेर्या झाल्या. पहिल्या फेरीमध्येच प्रताप सरनाईक यांना 5,968 मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर सरनाईक यांचे मताधिक्य वाढतच गेले.
मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष
शनिवार (दि.23) सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी 4 पर्यंत चित्र स्पष्ट झाल्यानंतर मतमोजणीच्या बाहेर सरनाईक यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी गेली. तर मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड प्रमाणात यश मिळालेले आहे. राज्यातील या यशाचे महामानकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीन वाघ आहेत. यांच्या नेतृत्वाखाली राज्यांमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. या मतदारसंघामधून निवडून येण्याची ही माझी चौथी टर्म असून वरिष्ठ नेत्यांच्या मनात आले तर यंदा मंत्रीपदी नक्कीच वर्णी लागेल, असे सरनाईक म्हणाले.
उमेदवार निहाय पडलेली मते..
प्रताप सरनाईक (शिवसेना ) 1,84,178
नरेश मणेरा (उबाठा) 76,020
संदीप पाचंगे (मनसे ) 13,552
नोटा 4,193