Published on
:
24 Nov 2024, 4:30 am
Updated on
:
24 Nov 2024, 4:30 am
जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे गावठी कट्टा पाहत असताना त्यातून अचानक गोळी सुटल्याने ती थेट पोटात गेली. त्यामुळे गुरुवार (दि.21) रोजी दुपारी एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सुरुवातीला हा अपघाताचा बनाव करण्यात येऊन शासकीय रुग्णालयात जखमी तरुणाला दाखल करण्यात आले. पोलिसांना याची कुणकुण लागल्याने एम आय डी सी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या प्रकरणी पोलिसांनीच फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे संशयित आरोपी भुरा उर्फ चुडामण भिल्ल आणि दिनकर दयाराम मोरे (वय ५०) हे दोघे गुरुवार (दि.21) रोजी दुपारी भूरा भिल्ल याच्या सासूच्या घराजवळ उभे होते. त्यावेळेला भुराभिल्याने त्याच्या जवळील गावठी कट्टा बाहेर काढला. तो कट्टा दिनकर मोरे ( रा. दापोरा) याने हातात घेऊन तो पाहू लागला. गावठी कट्टा पाहत असताना अचानक त्याच्यातून गोळी सुटली, ती दिनकर मोरे याच्या पोटात लागली त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
भुरा भिल्ल व त्याच्या नातेवाईकांनी दिनकर मोरे याला तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघात होऊन पोटामध्ये खडे गेले असेल असा बनाव करून शासकीय रुग्णालयात जखमीला दाखल करण्यात आले. याची कुणकुण एमआयडीसी पोलिसांना लागली. त्यांनी लागलीच शासकीय रुग्णालयात धाव घेऊन अधिक माहिती घेतली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी भुरा उर्फ चुडामण भिल्ल याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा देखील हस्तगत करण्यात आला आहे. जखमी दिनकर मोरे याच्यातर्फे तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर शासनातर्फे पोलिसांनीच फिर्याद देऊन आरोपी विरुद्ध एमआयडीसी पोलीस गुन्हा नोंद केला आहे.