डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा-कळवा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयPudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 6:31 am
Updated on
:
24 Nov 2024, 6:31 am
ठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा-कळवा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय झाला आहे. आव्हाड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना पराभवाची धूळ चारत तब्बल 96 हजार 184 एवढे मताधिक्य मिळवले आहे.
मुंब्रा-कळवा मतदारसंघाची मतमोजणी मुंब्र्यातील कौसा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुलावर पार पडली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. 21 फेर्यांमध्ये ही मतमोजणी पार पडली. पहिल्या फेरीपासूनच आव्हाड यांनी नजीब मुल्ला यांच्या विरुद्ध मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीत आव्हाड यांना 8 हजार 262 तर नजीब मुल्ला यांना 4 हजार 726 मते मिळाली. त्यांनतर शेवटच्या 21 व्या फेरीपर्यंत प्रत्येक फेरीत आव्हाड यांना मताधिक्य मिळत गेले. विशेष म्हणजे मुंब्र्यासारख्या मुस्लिम बहुल भागातही नजीब मुल्ला यांना जितेंद्र आव्हाड यांचे मताधिक्य तोडता आले नाही.
पंधराव्या फेरीनांतर जितेंद्र आव्हाड यांनी 50 हजार मतांची आघाडी घेतल्यावर आव्हाड यांचा विजय निश्चित झाला. पंधराव्या फेरीत आव्हाड यांना 1 लाख 7 हजार 240 तर नजीब मुल्ला यांना 51 हजार 977 मते मिळाली. एकविसाव्या फेरी अखेर आव्हाड यांना 1 लाख 57 हजार 97 मते मिळाली. तर नजीब मुल्ला यांना 60 हजार 913 मते मिळाली. मनसेचे सुशांत सूर्यराव यांना केवळ 13 हजार 914 मते मिळाली. तर 2 हजार 679 मतदारांनी नोटाला पसंती दर्शवली. आव्हाड यांनी नजीब मुल्ला यांना चितपट करत 96 हजार 784 एवढ्या मताधिक्याने विजय मिळवला.
स्वतःच्या विजयाच्या आनंदापेक्षा माविआच्या अपयशाचे दुःख जास्त
ठाणे : मला माझ्या विजयाच्या आनंदापेक्षा महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या झालेल्या पराभवाचे दुःख जास्त आहे. अशी खंत कळवा मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विजयी उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी विजयानंतर व्यक्त केली.
सकाळपासूनच आव्हाड आणि मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती. 15 व्या फेरीनंतर आव्हाड यांनी 50 हजाराची आघाडी घेतल्याने त्यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट झाले. यांनतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर ढोल ताशाच्या गजरात, फटाके उडवत एकच जल्लोष केला. सकाळपासून मतमोजणी केंद्रावर उपस्थित असलेल्या नजीब मुल्ला यांनी मात्र आपला पराभव निश्चित असल्याचे कळताच तेथून काढता पाय घेतला.
मुंब्रा-कळवा मतदारसंघातून नोटाला चौथ्या क्रमांकाची पसंती मतदारांनी दाखवली. या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला 11 उमेदवार उभे होते. त्यापैकी जितेंद्र आव्हाड यांना क्रमांक 1 चे मताधिक्य मिळाले. नजीब मुल्ला यांना दुसर्या तर मनसेचे सुशांत सूर्यराव यांना तिसर्या क्रमांकाची मते मिळाली. तर इतर 9 उमेदवारांना वरीलपैकी कोणीही नाही म्हणजेच नोटा पेक्षाही कमी मते मिळाली. या मतदारसंघात नोटाचे स्थान चौथ्या क्रमांकावर आहे.
महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. हा निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहे. मला पूर्वीपासूनच ईव्हीएम मशीन बद्दल शंका होती. आणि आता सुद्धा ईव्हीएमवर भरोसा नाही. त्यामुळे माविआच्या अपयशाचे कारण ईव्हीएममध्ये दडलेले आहे. असे वक्तव्य विजयी झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी केले. असे ते म्हणाले.
मुंब्रा-कळवा मतदारसंघातुन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. विजयानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी ते कौसा येथील मतमोजणी केंद्रावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आणि पूर्वी त्यांचेच शिष्य असलेले नजीब मुल्ला यांना पराभवाची धूळ चारत तब्बल 96 हजारांचे मताधिक्य मिळवले. मात्र मला माझ्या विजयाच्या आनंदापेक्षा महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या झालेल्या पराभवाचे दुःख जास्त आहे. अशी खंत कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विजयी उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी विजयानंतर व्यक्त केली.
यावेळी त्यांनी कळवा मुंब्य्रातील मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले की, कळवा-मुंब्र्यातील मतदारांनी चौथ्यांदा विकासाची साथ दिली आहे. मतदारांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला, निष्ठेची साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विरोधकांनी माझ्या विरोधात अनेक कटकारस्थाने केली. मात्र मी कायम त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या मतदारसंघाचा विकास कसा होईल हे पहिले. यापुढेही विरोधकांकडे दुर्लक्षच करत राहीन.