आ. आबिटकर यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे यांनी केली आहे.
Published on
:
24 Nov 2024, 6:18 am
Updated on
:
24 Nov 2024, 6:18 am
गुडाळ; आशिष ल. पाटील : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राधानगरी विधानसभा मतदारसंघ मंत्रीपदाच्या लाल दिव्यापासून वंचित राहिलेला असून या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केलेले आमदार प्रकाश आबिटकर यांना शिवसेनेने मंत्रिपद द्यावे. मतदार संघातील राधानगरी, भुदरगड आणि आजरा या डोंगराळ तालुक्यांचा सन्मान करावा, अशी मागणी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर १९६० पासून कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांना मंत्रीपद लाभलेले आहे. जिल्ह्यात केवळ राधानगरी-भुदरगड मतदारसंघच मंत्रीपदापासून वंचित राहिलेला आहे. २०१९ मध्ये शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून प्रकाश आबिटकर निवडून आले होते. त्यांना मंत्रिपद मिळणे क्रम प्राप्त असतानाही मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघ मंत्री पदाच्या लाल दिव्यापासून वंचितच राहिला.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले आमदार आबिटकर मोठ्या मताधिक्याने हॅट्रिक साधत विजयी झालेले आहेत. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होत असून अबिटकर यांना मंत्रीपद देऊन शिवसेनेने राधानगरी भुदरगड आणि आजरा या तालुक्यांचा सन्मान करावा, अशी आग्रही मागणी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.