‘नो एन्ट्री’ असल्याचे सांगितले म्हणून तरुणाला बेदम मारले File Photo
Published on
:
24 Nov 2024, 4:02 am
Updated on
:
24 Nov 2024, 4:02 am
Pune Crime News: विरुद्ध दिशेने कार चालवत आलेल्या कारचालकाला नो एन्ट्री असल्याचे सांगितले म्हणून चौघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. लोखंडी वस्तूने मारहाण केल्याने तरुणाच्या डोक्याला जखम झाली आहे.
याप्रकरणी रणजित किशोर शिंदे (वय 28, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारचालक, त्याचे तिघे साथीदार अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 22) रात्री साडेबाराच्या सुमारास भारत ट्रॅव्हल्ससमोरील सार्वजनिक रस्त्यावर गणेश पेठ परिसरात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे त्यांच्या पत्नीसोबत हॉस्पिटलमधून घरी निघाले होते. त्या वेळी जैन मंदिराकडून एक कारचालक विरुद्ध दिशेने येत होता. त्याला फिर्यादींनी पुढे नो एन्ट्री असल्याचे सांगितले. त्याचा कारचालकाला राग आला. त्याने फिर्यादींना शिवीगाळ केली तसेच हाताने त्यांना मारहाण केली. या वेळी मोटारीत असलेल्या एकाने लोखंडी वस्तूने फिर्यादीला मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पोलिसांनी शहरात बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणार्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईबरोबरच त्यांची वाहने जप्त करण्याची देखील कारवाई केली जाते आहे.