Published on
:
24 Nov 2024, 12:03 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:03 am
मुंबई : राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार, याबाबत कोणताही वादविवाद अथवा समज-गैरसमज नाही. आपण स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार तिघे एकत्र बसून चर्चेतून याबाबत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक असाच आहे. खरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कोणाची, याचा कौल राज्यातील जनतेने दिला आहे,?असे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी सांगितले. ‘एक है, तो सेफ है’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र कामी आला. त्यामुळे महायुतीला इतके मोठे यश मिळाले, असे या तिन्ही नेत्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली जाईलच; शिवाय राज्यात आर्थिक शिस्त कशी राहील, याकडे आपण कटाक्षाने लक्ष देऊ, असे अजित पवार यांनी सांगितले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व आमदारांना मुंबईत पोहोचण्यास सांगितले आहे. ते आल्यानंतर महायुतीच्या सर्व आमदारांची बैठक होईल, त्यानंतर विधिमंडळ नेत्याचे नाव निश्चित होईल.
निवडणुकीतील जागावाटप निश्चित करताना कोणतीच समस्या आली नाही. अगदी एकमताने तिन्ही पक्षांनी निर्णय घेतला. अगदी त्याच पद्धतीने मुख्यमंत्रिपदाबाबतचाही निर्णय होईल, असे शिंदे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत आम्ही चांगला धडा घेतला आहे. त्यामुळे आता एक विचारानेच निर्णय होईल, असे अजित पवार म्हणाले.