Published on
:
24 Nov 2024, 2:26 am
Updated on
:
24 Nov 2024, 2:26 am
बांबवडे : शाहूवाडी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी पारंपरिक आणि प्रतिस्पर्धी माजी आ. सत्यजित पाटील-सरूडकर यांचा तब्बल 36 हजार 833 मतांनी दारुण पराभव केला. सलग दुसर्यांदा विजय मिळवून आ. कोरे यांनी शाहूवाडी-पन्हाळा मतदार संघावरील अपली हुकमत पुन्हा सिध्द केली आहे. गत विधानसभा निवडणूक आणि चार महिन्यांपूर्वीच्या लोकसभेपाठोपाठ पुन्हा विधानसभा निवडणूकीत झालेल्या सलगच्या पराभवाने मा.आ. सरुडकरांना राजकीय अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, आणि पुन्हा एकवेळ महायुतीचे पाठीराखे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आ. विनय कोरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मा. आ. सत्यजित पाटील हे पारंपारीक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे टाकणार हे निश्चित झाले. सरूडकर यांनी ही निवडणूक‘करो या मरो’ या तत्वाने निकराने लढण्याचा चंग बांधला होता. त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीतला पराभव विसरून त्याच दिवसापासून मतदार संघात पायाला भिंगरी बांधून लोकसंपर्कावर भर दिला होता. कोणतीही मोठी राजकीय शक्ती पाठीशी नसताना बलाढ्य आणि मुरब्बी राजकारणी आ. कोरे यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. याऊलट आ. विनय कोरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर स्वभावाप्रमाणे आक्रमक रणनीतीवर भर देत सरुडकरांचे मनसुबे मोडून काढण्याची आघाडीच उघडलेली पाहायला मिळाली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तर परस्परविरोधी टीकाटिप्पणी आणि त्यातून प्रत्युत्तर देत एकमेकांना नामोहरम करण्याची झालेली खेळीही मतदारांनी अनुभवली.
सुरवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणार्या लढतीचे चित्र दिसत असताना ती काटाजोड लढतीकडे सरकते की काय अशी चिन्हे दिसू लागल्यावर अगदी शेवटच्या टप्यातही आ. कोरे यांनी गाफीलपणाला वाव न देता सूक्ष्म नियोजन आणि गतीमान प्रचारयंत्रणा राबविलीच शिवाय आवश्यक त्या राजकीय जोडण्या मफिटफ करीत आपला विजय अगदीच सोपा केला, असे राजकीय जाणकार सांगतात.
तत्कालीन पन्हाळ्याचे आ. कोरे यांची सन 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात राजकीय इन्ट्री झाली. त्यावेळी लगतच्या निवडणुकीत कोरे यांनी सत्यजित पाटील यांचा पराभव केला. पुन्हा 2014 ला चौरंगी विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांनी कोरेंना पराभूत करून वचपा काढला होता. अर्थात त्यात शाहूवाडीतून सत्यजित पाटील, कॉग्रेसचे कर्णसिह गायकवाड व पन्हाळयातून आ. डॉ कोरे आणि अमर पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्याचा फायदा सत्यजित यांना मतविभाजनातून झाला होता. अवघ्या 388 मतांनी झालेला पराभव कोरेंच्या जिव्हारी लागणे स्वाभाविक होते. त्यातूनच चांगला बोध घेत 2019 च्या विधानसभा निवडणूकीत कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील या दोन काँग्रेसच्या शिलेदारांना आपल्या तंबूत घेत, 27 हजार इतक्या मोठ्या मताधिक्याने विधानसभेचे मैदान मारले आणि सत्तेचा समतोल साधत मतदारसंघात एकहाती वर्चस्वही स्थापन केले. माजी आ. सत्यजित पाटील यांना दुसर्या, तिसर्या फळीतील कार्यकर्त्यांची अपुरी ताकद, त्यामुळे एकाकी झुंज द्यावी लागली, हेच त्यांच्या पराभवा मागचे कारण सांगितले जात आहे.
मात्र, सरुडकर यांनी संपर्काच्या जोरावर एक लाखभर मते मिळवत अभेद्य गटासह सामान्य मतदार अद्यापही आपल्यामागे उभा असल्याचे दाखवून दिले आहे. सरुडकरांसाठी त्यांचे वडील बाबासाहेब पाटील, केडीसीचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, शेकापचे भारत पाटील, सरूडकर गटाच्या निष्ठांवंतांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले, परंतु कोरेंच्या मुरब्बी डावपेचांपुढे निभाव न लागल्याने सरूडकरांचा अश्व भाडळे खिंडीतच अडवला गेला आणि पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले.